जन्माष्टमी उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचा पुढाकार
अलिबाग (धनंजय कवठेकर) : अलिबाग तालुक्यातील चोंढी पंचक्रोशीत श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी उत्सवात सहभागी होत श्रीकृष्ण भक्तांना व गोविंदा पथकांना कोणतीही अडचण व गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली.
ढाक्कुम- माक्कुम ढोल ताशाच्या गजरात व गोविंदा आला रे आला च्या सुरात तर काही ठिकाणी संगीत वाद्यावर तर काही ठिकाणी डीजेच्या तालावर अधूनमधून आलेल्या पावसाच्या सरीवर भिजत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सहभागी झालेले सर्व श्रीकृष्ण भक्तांनी व गोविंदा पथकांनी चोंढी, बामणसुरे, किहीम, कामथ या गावातील ठिकठिकाणच्या नाक्यावर, चौकात तसेच घरगुती बांधलेल्या लहान मोठ्या व कमी जास्त उंचीच्या दहीहंड्या मोठ्या जल्लोषात फोडून उत्सव साजरा केला.
गोविंदा पथकांना दहीहंड्या फोडताना पाहण्यासाठी लहान बालगोपालांसह सर्व गटातील महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली होती. हा सण आनंदात साजरा करण्यासाठी यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनीही उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होत सर्व बालगोपालांची विशेष काळजी घेतली होती, तसेच यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांडवा पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला होता. या भागातील गावात काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी दहीहंड्या फोडण्यात आल्या, यावेळी शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत किरकोळ जखमी झालेल्या गोविंदा व्यतिरिक्त कोणीही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही. यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.