१० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा
मुंबई मंडळ सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीसाठी १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : पुनर्विकास प्रकल्पातील म्हाडाच्या हिश्श्यातील गृहसाठ्यापैकी ३७० सदनिकांच्या किंमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी दिली.
मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीचे उदघाटन बुधवार करण्यात आले. यावेळी आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ व पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्माण करण्यात आलेल्या 'श्री आणि श्रीमती निवासी' या शुभंकर चिन्हाचे (Mascot) अनावरण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते म्हाडा मुख्यालयात करण्यात आले.
म्हाडाला पुनर्विकास प्रकल्पातून प्राप्त झालेल्या त्यांच्या वाट्यातील ३७० सदनिका संगणकीय सोडत विक्री जाहीर करण्यात आली आहे. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. तसेच अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २० टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १५ टक्क्यांनी, उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची माहिती सावे यांनी दिली. यानुसार सुधारित किंमती मुंबई मंडळाद्वारे लवकरच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच प्रसिद्धी पत्रकांद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
म्हाडाने जाहीर केलेल्या या नवीन किमतीतून आपल्या स्वप्नाचे घर खरेदी करण्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला दि. १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा देखील सावे यांनी याप्रसंगी केली. म्हाडाच्या नूतन शुभंकरचे म्हाडा परिवारात स्वागत करताना सावे म्हणाले की, हे शुभंकर म्हणजे म्हाडाकरिता शुभेच्छा दूत प्रमाणेच भूमिका निभावणार आहेत. म्हाडा हे एक लोकाभिमुख कार्यालय असल्याने अनेक नागरिक या म्हाडाच्या विविध कार्यप्रणालीस भेट देत असतात. अशावेळी म्हाडाच्या कार्यप्रणालीची ओळख व मार्गदर्शन मिळविण्याकरिता नागरिकांना 'श्री आणि श्रीमती निवासी' यांच्याद्वारे या शुभंकरची मदत होणार असल्याचे सावे म्हणाले. म्हाडाने नेहमीच बदलत्या काळाशी जुळवून घेत आपल्या कार्यात बदल केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत म्हाडाने लोकाभिमुख सेवा ऑनलाइन करत नागरिकांच्या अनेक अडचणी सोडविल्या आहेत तसेच सदनिकांच्या विक्रीकरिता IHLMS २.० ही अत्यंत पारदर्शक संगणकीय सोडत प्रणाली देखील कार्यान्वित केली आहे. याच लोकसेवेच्या पार्श्वभूमीवर एक पाऊल पुढे टाकत म्हाडाचे नवे शुभंकर चिन्ह (मॅस्कॉट) निर्माण केले असल्याचे सावे यांनी सांगितले.
यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य अभियंता-२ धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, उपसचिव गृहनिर्माण विभाग अजित कवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार पी. डी. साळुंखे, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, विधी सल्लागार मृदुला परब, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते.