Kalyan news : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये निषेध आंदोलन




डोंबिवली ( शंकर जाधव ) :  कल्याण येथील  छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कल्याण डोंबिवली जिल्हातर्फे बुधवारी निषेध आंदोलन करण्यात आले. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटात केले. आणि अनावरण होऊन एक वर्षही लोटले नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांनी सांगितले.

 कल्याण येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली. महायुतीचे काळे कारणामे असलेले फुगे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील म्हणाले, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी त्यांची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसेच निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे. भविष्यात कधीही महापुरुषांचा असला अवमान सहन केला जाणार नाही. महायुती सरकारने पंतप्रधान यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी उद्घाटन करून मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण केले होते.



 महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला असून पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेमुळे महाराजांचा अवमान झालेला आहे. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमी मध्ये प्रचंड असंतोष दिसून येत असून सर्वत्र संताप व्यक्त केला आहे. केवळ चार पुतळे उभारलेल्या जगदीश आपटे यांना एवढ्या कमी अनुभव असलेल्या व्यक्तीला कंत्राट कसे मिळाले? हा आपटे हा कोणाचा मित्र आहे? याची देखील चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे हे महायुतीचे काळे कारनामे सामान्य जनतेपुढे पोहोचण्यासाठी आम्ही निषेध आंदोलन करीत आहोत.


        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्निल रोकडे, कार्याध्यक्ष प्रशांत माळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, युवक विधानसभा अध्यक्ष ओम सावंत, प्रा. प्रवीण देशमुख, भाऊसाहेब पानसरे, कल्याण पूर्व महिला अध्यक्ष मीनाक्षी आहेर, अशोक राजपूत, निखिल कदम, हर्षल घोलप, संजय राजपूत, स्वप्नील शेळके, अनिल जगताप, अनिकेत बागुल, अभिषेक कर्णिक, भानुदास घुगे, विजय कारके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post