मनसे आ. प्रमोद (राजू) पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाजूकडील विस्तारित भागावर दीड वर्षांपासून छत नसल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हाचा, तर पावसाळ्यात पावसाचा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येचा मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी जोरदार पाठपुरावा केला, आणि त्यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. मध्य रेल्वेने आमदार पाटील यांना छताच्या कामासाठी लेखी आश्वासन दिले असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक असून, दररोज येथे हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. तरीही, स्थानकातील विविध समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित भागात सुमारे दीड वर्षांपासून छत नव्हते, ज्यामुळे प्रवाशांना उन्हाच्या आणि पावसाच्या कडकडीत तडाख्याचा सामना करावा लागत होता. प्रवासी संघटनांकडून आणि प्रवाशांकडून वारंवार मागणी होऊनही, छताचे काम रखडले होते.
या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला आणि पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा ठामपणे मांडला. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने अखेर छताच्या कामास सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याने डोंबिवलीकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.