१ डिसेंबर २०२४ पासून आयसीसीची सूत्र सांभाळणार
नवी दिल्ली : जय शाह यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. BCCI सरचिटणीस पदाचा मान मिळविल्यानंतर ते आता आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. जय शाह न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कलेची जागा घेणार आहेत. ग्रेग बार्कले यांनी २४ नोव्हेंबर २०२० रोजी आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारले होते. आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे जय शहा हे तिसरे भारतीय आहेत. यापूर्वी एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीयांनी हे पद भूषवले आहे. जय शाह यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यकाळ १ डिसेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे.
सध्याचे चेअरमन ग्रेग बार्कले यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे, तर गव्हर्निंग बॉडी आणि त्याचे प्रमुख प्रसारण अधिकार धारक स्टार यांच्यात $ ४.४६ बिलियनचा वाद सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन मोठ्या संघांनी शाह यांना पाठिंबा दिला आहे. जय शाह तीन वर्षे ICC चे अध्यक्ष भूषवतील.
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी बोर्डाला पुष्टी दिली आहे की ते तिसऱ्या टर्मसाठी उभे राहणार नाहीत आणि नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. बार्कले यांची नोव्हेंबर २०२० मध्ये स्वतंत्र ICC अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यानंतर त्यांची २०२२ मध्ये पुन्हा निवड झाली. आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले होते की, सध्याच्या संचालकांना आता २७ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुढील अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करावे लागतील आणि जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर निवडणूक होईल पण तसे झाले नाही आणि जय शहा यांची बिनविरोध निवड झाली.