Tell us how to learn? : सांगा आम्ही शिकायचे कसे ?

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा टाहो


दिवा, (आरती मुळीक परब) : दिवा पश्चिमेतील गावदेवी मंदिराजवळ महापालिकेच्या शाळेमध्ये दिले जाणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे, पिण्यासाठी पाणीच नाही, बाथरुमच्या खिडक्यांना काचाच नाहीत, शाळेतील वर्गांची सफाई विद्यार्थी करत, असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यांना वेळेत पुस्तके, गणवेश, दफ्तरे ही मिळत नाहीत. सांगा आम्ही शिकायचे कसे असा टाहो पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केला आहे.




दिवा स्टेशनजवळ गावदेवी मंदिरच्या बाजूला एकाच इमारतीमध्ये महापालिकेच्या दोन शाळा सुरु आहेत. त्यात एकूण १४०० च्या आसपास विद्यार्थी आहेत. शाळा पंधरा जुलैपासून सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी पालकांना दिसून येऊ लागल्या. घरात व्यवस्थीत जेवण असून मुले का आजारी पडत आहेत. हे तपासले असता. शाळेत मिळणाऱ्या मध्यान्य भोजनामुळे मुले आजारी पडत असल्याचा निष्कर्ष पालकांनी काढला. ते जेवण मुले खायची बंद झाल्यास ती आजारी पडणे ही बंद झाली. पालिका शाळेतील मुलांना दुपारचे मिळणारे जेवण हे भात, डाळ असते. त्यातील भात हा कच्चा तर डाळ नेहमी आंबलेली असते, असे मुले घरी पालकांना सांगतात. तसेच तेथे लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कुरमुऱ्यांच्या, राजगिऱ्याच्या लाडूंच्या पॅकेटवर कोणती एक्सपायरी डेट नसते, तर त्या लाडूंमध्ये ही माशी मेलेली सापडते, असे निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन आमची मुले आजारी पडतात, असा संताप पालकांनी आज व्यक्त केला.



या जेवणात केस, झुरळ, भांडी घासायच्या काथ्याची तार सापडल्याने काही मुले शाळेतील अन्न जेवतच नाहीत. यावर पालकांनी शिक्षकांना तक्रार दिली असता, आम्ही ठेकेदाराला सांगतो ऐव्हढेच सांगतात. पण त्या जेवणात काहीच बदल होत नाहीत. या जेवणामुळे मुलांमध्ये पोटदुखी, उलटी, जुलाब, घशाला खवखव होणे, मळमळणे असे आजार होत आहेत.


 



हे जेवण बनवताना एका निळ्या पाण्याच्या टाकीत भरलेले अशुध्द पाणी वापरले जात असून कॉनफ्लॉवर, बेसन डाळ घट्ट करण्यासाठी वापरण्यात येत आहे. तर डाळ, उसळी बनवण्यासाठी पाम तेलाचा वापर केला जात आहे. या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी रेशनचा तांदूळ वापरल्याने तो ही कच्चा शिजवला जातो. हे असे निकृष्ट दर्जाचे अन्न खाऊन मुले आजारी पडत आहेत. दिव्यातील पालिका शाळेतील निकृष्ट जेवण देऊन पालिका आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करत आहे, असे संतापलेल्या पालकांनी सांगितले.


 



तर शाळा भरायच्या आधी वर्गांची स्वच्छताही होत नाही. कोणत्याही मुलाकडून पाणी सांडल्यास. त्या मुलानेच पुसायचे फडके आणून ते पाणी पुसायचे. या पालिका शाळेतील मुलांच्या कोणत्या ही बाथरुममध्ये खिडक्यांना काचा नाहीत. तर पहिल्या मजल्यावरील बाथरुमध्ये सातवी, आठवीतील मुली गेल्या त्यांना शाळेबाहेर असणाऱ्या मुलांकडून छेडले जाते. तसेच जेवण आल्यानंतर पहिल्या, दुसऱ्या मजल्या वरील विद्यार्थ्यांना स्वतःची भांडी घेऊन खाली येऊन जेवण घ्यावे लागते. तर जेवणाच्या डब्ब्यांमधील जेवण संपले की विद्यार्थी ते डब्बे उचलून रिक्क्षा मध्ये ठेवतात. आम्ही मुलांना शाळेत शिकायला पाठवतो की शाळेतील शिपायाची कामे करायला, असा संतप्त सवाल करत पालकांनी नाराजी व्यक्त केली.  


 



आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मुले पालिका शाळेत घातली आहेत. पण या शाळेत तर विद्यार्थ्यांचे खुप हाल होत आहेत. त्यांना नोकरासारखे राबवले जात आहे. तर जेवण ही निकृष्ट मिळत आहे. त्यात भर अशी की त्यांना पुस्तके, गणवेश, दप्तरे ही वेळेत मिळत नाही. दिवाळी नंतर त्यांना जुलैच्या अभ्यासक्रमाची पुस्तके मिळत आहेत. मग त्या मुलांनी अभ्यास कसा करायचा. त्यांच्या शैक्षणिक आयुष्याची शिक्षणविभाग आणि शाळा का वाट लावत आहेत, असा प्रश्न पालक शिक्षकांना विचारत आहेत. तसेच आमच्या मुलांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाणार असेल अन् त्यामुळे आमची मुले आजारी पडणार असल्यास हे निकृष्ट दर्जाचे शासनाचे जेवण आमच्या मुलांना नको अशी भूमिका यावेळी पालकांनी मांडली. जानवी परब, सुवर्णा बांदेकर, उदय कांबळे, निलेश रामाणे, दिलीप शिगम, श्रावणी कदम, नामदेव पाटील, योगेश लोंढे, पार्वती चव्हाण, रेश्मा वानखेडे यांसह इतर पालक यावेळी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post