डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण गुन्हे अन्वेशन विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारच्या सुमारास काहीजण चारचाकी वाहन ( क्रमांक एम. एच. ४६ - बी.ई - ५४२६ मधून ) व्हेल माशाची उलटी अनधिकृतरित्याजवळ बाळगुण विक्रीसाठी मौर्या धाब्याच्या बाजूला, बदलापूर पाईपलाईन रोड, मानपाडा, डोंबिवली पूर्व येथे येणार होते. याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेशन विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा कारवाई करून तीन संशयीत इसमांना ताब्यात घेतले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल राधाकृष्ण भोसले (५५), अंकुश शंकर माळी (४५ ), लक्ष्मण शंकर पाटील (६३, ) अशी अटक केलेल्या संशयित्यांची नावे आहेत. त्याच्याकडील चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ५ किलो ६४२ ग्रॅम वजनाची सहा कोटी वीस लाख रुपये किमतीची सफेद रंगाच्या पिशवीमध्ये सेलो टेप लावून गुंडाळलेली व्हेल माशाची उलटी मिळून आली. आपसात संगनमत करून तिघांनी व्हेल माशाचे उलटी बेकायदेशीररित्याजवळ बाळगून त्याची वाहतूक करून विक्री करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्याविरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त( गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि संतोष उगलमुगले, सपोनि संदिप चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा विश्वास माने, पोहवा विलास कडु, पो.कॉ. गुरूनाथ जरग, पो.कॉ.मिथुन राठोड, पो.कॉ.गोरक्ष शेकडे यांनी केलेली आहे.