देशातील आठ राज्यांना पावसाचा तडाखा
मुंबईत सहा जणांचा मृत्यू
मुंबई: महाराष्ट्र आणि गुजरातसह देशातील आठ राज्यांतील अनेक भागांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मुंबईत पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या पावसाची बॅटिंग शुक्रवारी देखील सुरूच होती. महाराष्ट्रातील हवामान इतके खराब झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यातील प्रस्तावित कार्यक्रम रद्द करावा लागला.गेल्या २४ तासांत गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्याचवेळी ११० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ३०० हून अधिक झाडे उन्मळून पडली आणि अनेक ठिकाणी विजेचे खांबही उन्मळून पडल्याची घटना घडली.
मुंबईत बुधवारी सायंकाळी उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारीही वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक लोकल ट्रेन धावल्या नाहीत आणि १४ उड्डाणेही वळवावी लागली. गुरुवारी देशातील बहुतांश भागात पाऊस थांबला असला तरी हवामान खात्याच्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालये बंद राहिली. ठाणे, पालघर, पुणे, रायगड या आसपासच्या जिल्ह्यांमध्येही हीच परिस्थिती होती. शुक्रवारी देखील पावसाचा जोर कायम होता. ठाणे, मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने चांगला जोर धरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शेतकरी देखील चिंताग्रस्त झाला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मान्सून साधारणपणे ५ ऑक्टोबरपर्यंत माघार घेतो. मात्र राजस्थानमधून नैऋत्य मान्सूनचे प्रस्थान होण्यास उशीर झाल्यामुळे यंदा १० ते १२ ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ते वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, बंगाल, सिक्कीम, यूपी, उत्तराखंड आणि हिमाचलच्या अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरत, वडोदरा आणि अहमदाबादच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. सुरत आणि वडोदरा येथे ३ इंच पावसाची नोंद झाली आहे. अहमदाबादमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, येथे पावसाचा जोर फारसा नव्हता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खांब पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला.