महापालिकेमार्फत ५,५०० दिव्यांग व्यक्तींना लाभ
कल्याण, ( शंकर जाधव) : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेकडे सुमारे ५,५०० दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केलेली आहे. या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजीओथेरेपीची कोठलीही सुविधा विनामुल्य स्वरुपात उपलब्ध नव्हती. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी सदर बाबीची दखल घेऊन, आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून समाज विकास विभागाने काढलेल्या निविदेला महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी मंजुरी दिली असून, या कामाचे कार्यादेश आधार रिहॅबिलेटेड सर्विसेस यांना देण्यात आले आहेत.
यामुळे ३/क प्रभाग कार्यालया शेजारी असलेल्या महिला कल्याण केंद्राच्या वास्तुमधील तळमजल्यावर ही सुविधा संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. सदयस्थितीत ही सुविधा ३ वर्षासाठी उपलब्ध राहणार असून, त्याकरिता ४,७५,५०,००० /- हजार इतका खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली आहे.
या केंद्रांमध्ये Medical Consultation, Orthopedic Consultation, Neurological Consultation, Ayurvedic Consultation, Homeopathic Consultation, Psychological Counselling त्याचप्रमाणे फिजिओथेरपी, शारीरिक उपचार, व्यावसायिक थेरपी (Occupational therapy), स्पीच थेरपी, Activities of Daily Living, Interventional Learning Activties, योग आणि ध्यान, केअरगिव्हर्सना वैयक्तिकृत प्रशिक्षण आणि समुपदेशन हे सर्व विनामुल्य स्वरुपात उपलब्ध होणार आहेत. या उपचारांमुळे व्याधीग्रस्त नागरीकांना/दिव्यांगाना त्यांच्या उपचारांसाठी/फिजिओथेरपीसाठी महापालिका क्षेत्राबाहेर ठाणे व मुंबई येथे जावे लागणार नाही. महापालिका दिव्यांगासाठी करीत असलेल्या या सोयीसुविधेमुळे दिव्यांग व्यक्तींना नवसंजिवनी प्राप्त होवून, त्यांचे जीवन अधिक गतीमान व आनंदी होण्यास मदत होईल.