महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत संवाद शिबीर संपन्न



अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : सुरभी स्वयंसेवी संस्था, माणुसकी प्रतिष्ठान, महाराष्ट्र अंधश्र‌द्धा निर्मूलन समिती अलिबाग व स्पर्धाविश्व अकॅडमी, तेजस्विनी फाउंडेशन, उज्वल भविष्य सामाजिक संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ३५ वर्ष महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत आहे. १. शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे २. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे ३. धर्माची विधायक, कठोर, कृतिशील आणि काल सुसंगत चिकित्सा करणे ४. संत आणि समाजसुधारकांचा वारसा आणि संविधानाचा मूल्य कृतिशील करणे ५. व्यापक परिवर्तनाच्या चळवळींशी जोडून घेणे या पंचसूत्रीच्या आधारे समिती काम करत आहे. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना समितीमार्फत जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा असे दोन कायदे पारित करून घेण्यात आले आहेत. 



दिनांक२० ऑक्टोबर रोजी समितीमार्फत अलिबाग, रायगड येथे अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनासाठी शैला पाटील कार्याध्यक्ष सार्वजनिक वाचनालय जिल्हा ग्रंथालय अलिबाग हे मान्यवर लाभले होते. उद्घाटना वेळी मान्यवरांच्या हस्ते पाण्यापासून दिवा पेटवून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची व्यापक वैचारिक भूमिका व पंचसुत्री, मानसिक आरोग्य, चमत्कार व त्यामागील विज्ञान व स्त्री सन्मानासाठी पुरुष भान असे विषय मांडण्यात आले. तसेच या शिबिरात फलज्योतिष आणि छद्म विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन भूत भानामती या विषयांवर ही चर्चा करण्यात आली. 

शिबिरासाठी सुरभी स्वयंसेवी संस्था, माणुसकी प्रतिष्ठान, स्पर्धा विश्व अकॅडमी, तेजस्विनी फाउंडेशन, उज्वल भविष्य सामाजिक संस्था या संस्थांचा सुद्धा समावेश होता. तसेच शिबिरासाठी अलिबाग येथे ५० शिबिरार्थी सहभागी होते. भारत भुषण पुरस्कारार्थी जिविता पाटिल सचिन बेवेकर यांनी सूत्रसंचालन केले माननीय नितीन कुमार राऊत अंधश्रद्धा निर्मूलनचे माजी सरचिटणीस यांनी पाण्यावरचा दिवा पेटून उद्घाटन केले.




अलिबाग शाखेच्या अध्यक्ष शुभांगी जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाराष्ट्र आणि राज्य कार्यवाह संदेश गायकवाड यांनी महाराष्ट्राची वैचारिक भूमिका याची मांडणी केली.

तसेच माननीय जेष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनिल डोंगरे यांनी मानसिक आरोग्य व स्त्रिया व बालके यांच्यामधील वाढता ताणतणाव याबद्दल वैचारिक मांडणी सांगून युवांना मार्गदर्शन केले सुरभी संस्थेचे अध्यक्ष सुप्रिया जेधे यांनी भूत, भानामती ,करणी बुवाबाजी व वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्कारामागील विज्ञान याबद्दलचा प्रयोग मार्गदर्शन केले. 

तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्राच्या महिला विभाग कार्यवाह माननीय आरती नाईक यांनी पुरुषभान याविषयी संवाद साधून मार्गदर्शन केले. शाखेचे सुभाष पानसकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी उपस्थित रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षा निर्मला फुलगावकर, ॲड. संध्या कुलकर्णी यांचा सहभाग होता. 




Post a Comment

Previous Post Next Post