अलिबागमधून चित्रलेखा पाटील, उरणमधून प्रीतम म्हात्रे, पेणमधून अतुल पाटील आणि पनवेलमधून बाळाराम पाटील यांना उमेदवारी
अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उजाडली तरी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना, या प्रश्नाला मंगळवारी शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी उत्तर दिले. शेकापने आपले चार उमेदवार जाहीर केले. या वेळी शेकडो शेकाप कार्यकर्ते लाल बावटा घेऊन हजर होते. जणू लाल वादळ आल्याचे भासत होते. अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथे मंगळवारी दुपारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत जयंत पाटील उमेदवार जाहीर करणार होते याची कल्पना कार्यकर्त्यांना होती, त्यामुळे कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहात होते.
रायगड जिल्ह्यात शेकोपची ताकद आहे. विशेषतः अलिबाग, पेण, पनवेल, उरण, या तालुक्यात शेकापचा मोठा कार्यकर्ता आहे. हे मतदार संघ शेकापचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. त्यामुळे सुरुवाती पासून शेकाप या जागांवर दावा करून होता. महाविकास आघाडी मधून शेकापने या मतदार संघाची मागणी केली होती. परंतु काँग्रेस देखील अलिबाग मध्ये आग्रही असल्याने शेकाप काय भूमिका घेणार याची उत्सुकता रायगड वासियांना लागून राहिली होती. आज ही उत्सुकता संपुष्टात आली. जयंत पाटील यांनी अलिबागमधून चित्रलेखा पाटील, उरण मधून प्रीतम म्हात्रे, पेण मधून अतुल पाटील, आणि पनवेलमधून बाळाराम पाटील यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली. या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
आज आम्ही, आमचे उमेदवार जाहीर केले असेल तरी, आम्ही आजही महाविकास आघाडी सोबत आहोत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर आपले बोलणे झाले आहे. त्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे आम्ही आजही आशावादी आहोत असे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले. आम्ही आमदारकी खेचून आणू असा विश्वासही व्यक्त केला. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात आमदार महेंद्र दळवी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना, जो आमदार विधानसभेत एकही शब्द बोलला नाही, त्याला मत मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका केली. मोठ्या जाहीर सभा घेण्या ऐवजी गाव सभा घेण्याच्या सूचना केल्या. पनवेल मध्ये जोर देण्याचा सल्ला दिला. यावेळी प्रा. एस. व्ही. जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.