जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल
अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : अलिबाग शहरात मंगळवारी धक्कादायक घटना घडली. कामाचा मोबदला मागायला गेलेल्या दोघांवर नादब्रम्ह इडलीच्या मालकाने धारदार चाकूने हल्ला केला. ही घटना भरदुपारी कामत आळी येथे घडली. पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामत आळीत ही घटना घडल्यानंतर आरोपीने पलायन केले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यातील भाल येथील रहिवासी अक्षता दळवी (वय २२) व वायशेत येथील सायली मार्कील (वय २९) या दोघी जवळपास वर्षभरापासून नादब्रम्ह इडली दुकानाचे मालक राजेश कारिया यांच्याकडे कामाला होत्या. त्यांनी मिळून काम सोडण्याचे ठरविले होते. त्यानूसार त्यांनी कारिया यांना कळविले होते. मात्र दोन दिवसांनी सांगा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्याप्रमाणे अक्षता, सायली मार्किल व तिचा पती रविंद्र मार्किल हे त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले. यावेळी तरुणींनी कामाचा मोबदला मागितला. मात्र कारिया यांनी पैसे पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये देण्यात येईल, असे सांगितले. यावरुन त्यांच्यात शाब्दिक मतभेद झाले. तसेच कारिया यांनी संतापाच्याभरात अक्षता व रविंद्र या दोघांवर धारदार चाकूने वार केले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत.