एव्हर ग्रीन सायकल प्रेमी' ग्रुपचा पर्यावरण- आरोग्याचा कानमंत्र

 


    विकलांग मुले, घरकाम करणाऱ्या महिलांना शिकवितात सायकल 

 

   डोंबिवली ( शंकर जाधव )   :  डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये प्रदूषणाची समस्या मोठी आहे. तेथील काही तरुण आणि  ज्येष्ठ महिलांनी 'एव्हर ग्रीन सायकल प्रेमी' असा एक ग्रुप तयार केला. काही जुन्या सायकली घेवून स्वखर्चाने दुरुस्ती करून त्यांनी घेतल्या आहेत. त्यातून त्या लहान मुले/मुली, विकलांग मुले, घरकाम करणार्‍या महिला, ज्येष्ठ महिला इत्यादींना सायकल शिकवण्याचे प्रशिक्षण  देवून पर्यावरण आणि आरोग्य याचा कानमंत्र देत आहेत. या ग्रुप मधील महिला या सर्वाना विनामूल्य सायकल शिकवीत आहेत. त्यांना यासाठी काही सायकल्सची आवश्यकता असल्याने त्यांनी तशी मागणी काही संस्थांकडे आणि दानशूर नागरिकांकडे केली होती.




 मिलापनगर रेसीडेंस वेलफेअर असोसिएशनने या चांगल्या कार्यासाठी त्यांना एक नवीन सायकल भेट दिली आहे. एव्हर ग्रीन सायकल प्रेमी ग्रुप तर्फे  हर्षल सरोदे, सरोज विश्वामित्रे, सुवर्णा राणे, योगिता थोटांगे, रविना जाधव, मनिषा तांबे, कल्पना बोंडे, शोभा चौगुले, विभा वाघमारे, सरोज उपाध्याय, जयश्री बोरसे, नालंदा शेवाळे, दिपा नाईक, सुनंदा वायंगणकर या महिलांनी सदर नवीन सायकलचा स्विकार केला. याप्रसंगी मिलाप रेसी. वेलफेअर असोसिएशनतर्फे वर्षा महाडिक. अरविंद टिकेकर, प्रसाद कांत, राजू नलावडे, निखिल लाटकर, अरुण जोशी, मिलिंद जोशी, डॉ.मनोहर अकोले इत्यादी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


 इनरव्हील क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टार्स यांच्यातर्फे पण अध्यक्षा अर्चना नायर यांच्याहस्ते याच ग्रुपला एक नवीन सायकल भेट देण्यात आली आहे.'एव्हर ग्रीन सायकल प्रेमी'  या ग्रुपने पावसाळ्यात डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील उंबार्ली टेकडीवर सायकलवरून जावून वृक्षारोपण केले होते.जागतिक पर्यावरण दिन, स्वच्छता मोहीम, सायकल भ्रमंती इत्यादी कार्यक्रमांचे ते आयोजन करीत असतात. गणेश उत्सवात अनंत चतुर्दशी या दिवशी या सर्व महिलांनी टिटवाळा येथे सायकलने जावून महागणपतीचे दर्शन घेतले होते.





Post a Comment

Previous Post Next Post