पिंपरी - चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी पाण्याची टाकी कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर ढिगाऱ्याखाली दहा ते पंधरा कामगार अडकले होते.
भोसरी परिसरातील सदगरू नगर परिसरात लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या मजुरांवर पाण्याची टाकी पडल्याने भीषण अपघात झाला. टाकीच्या ढिगाऱ्याखाली कामगार गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून मृतांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. सध्या बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या मलबा हटवून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बिल्डरने ही पाण्याची टाकी फसव्या पद्धतीने बांधल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, पाण्याची टाकी ज्या ठिकाणी कोसळली ती मालमत्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेची नाही, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.