दिवा, (आरती परब) : श्री छत्रपती शंभू राजे संघटना, दिवा शहर यांच्यातर्फे गेल्या तीन वर्षांपासून दिव्यातील दातिवली तलावाजवळ दिवाळी पहाटचे आयोजन केले जात आहे. या दिवाळी पहाटचे हे चौथे वर्ष असून या दिवाळी पहाटला सुश्राव्य संगीत, मराठी भक्ती गीतांनी सुरुवात झाल्याने दिव्याच्या दातिवली परिसरातील आसमंत उजळून निघाला होता.
पहिला दिवा शिव छत्रपतींसाठी, तर दुसरा दिवा हा शंभू राज्यांसाठी ही शिकवण मनात ठेऊन येथे पहिला अन् दुसरा दिवा लावण्यात आला. त्यानंतर दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते होऊन संगीतमय दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात नागरिकांनी पाच हजार पाचशे मातीचे दिवे लावून केली.
धावपळीच्या आयुष्यात थोडी विश्रांती तसेच सणांचा पहिला दिवस आनंदी, चैतन्यमय जावा यासाठी ही संगीत दिवाळी पहाट ठेवली जाते, असे संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले. या वेळी जय हनुमान भजन मंडळ, बेतवडे यांच्या सुश्राव्य संगीत भजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील गीतकारांनी बहारदार भक्ती गीते, अभंग, गवळणी, देशभक्तीपर गीते, भजन, मराठी व हिंदी चित्रपटातील अनेक गीताचे सादरीकरण करत उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कदम यांनी केले. तसेच त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा ही सत्कार करण्यात आला.
त्यावेळी माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक जाधव, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, संस्थापक मदन पाटील, अध्यक्ष राजेश गणपत पाटील, सोपान पाटील, विजय भोईर, निषा राजेश पाटील, कल्पीता पाटील, रश्मी पाटेकर, सर्व महिला सभासद, श्री छत्रपती शंभू राजे संघटनेचे संपूर्ण टीम उपस्थित होती. तर तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती ह.भ.प. राजाराम महाराज दळवी, ह. भ.प. प्रकाश महाराज दळवी, धर्मेंद्र शेलार, शरद पाटील, राजेश पाटील, रंदीप मढवी, निखिल पाटील, कैलास पाटील, प्रणील दळवी, काळू मढवी, सचिन चौबे, सदा पाटील यांची होती.