आठ दिवसांच्या उत्सवाचा थाटात समारोप
डोंबिवली ( शंकर जाधव) : संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात झालेल्या आठ दिवसांच्या भव्य अखिल भारतीय आगरी महोत्सवात आगरी समाजाबरोबरच विविध समाजातील ऐक्याचे प्रदर्शन झाले. डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री आगरी महोत्सवाची सांगता करण्यात आली. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, महोत्सवाचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात भविष्यात संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे प्रेरणादायी स्मारक आणि सामाजिक प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम २००४ मध्ये डोंबिवली येथे आगरी युथ फोरमच्या वतीने आगरी महोत्सव सुरू झाला होता. यंदा महोत्सवाचे २० वे वर्ष होते. त्यानिमित्ताने नागरिकांसाठी आगरी खाद्य संस्कृती, परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच विविध जाती व समाजासाठी विविध कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमांना हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १० डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या आठ दिवसांच्या उत्सवाचा काल रात्री समारोप करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर पत्रकार दीपक म्हात्रे, जे. डी. तांडेल, ज्येष्ठ नेते गंगाराम शेलार, माजी नगरसेवक साई शेलार, आगरी युथ फोरमचे उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, जालिंदर पाटील, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, चिटणीस प्रकाश भंडारी, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, दिलीप देसले, संतोष संते, गुरुनाथ म्हात्रे, जयेंद्र पाटील, भानुदास भोईर, नारायण म्हात्रे, कांता पाटील, अनंता पाटील, विनायक पाटील, अशोक पाटील, सदानंद म्हात्रे, प्रवीण पाटील, सल्लागार प्रभाकर चौधरी, सुभाष चं. म्हात्रे, दत्ता वझे, बंडू पाटील, गजानन मांगरुळकर, चंद्रकांत पाटील, डॉ. दिनेश म्हात्रे, राम पाटील, सुरेश जोशी, रंगनाथ ठाकूर, नंदू शां. म्हात्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी आगरी महोत्सवाच्या यशाबद्दल सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक केले. आगरी समाजाबरोबरच अन्य समाजालाही बरोबर घेऊन जाणारा हा उत्सव सामाजिक ऐक्य घडविणारा आहे, अशी भावना ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली. वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात लोकसंख्या वाढणार आहे. त्यादृष्टीकोनातून आगरी समाजाबरोबरच सर्व तरुणांनी व्यवसायात वाढणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आदरणीय स्व. नानासाहेब धर्माधिकारी, स्व. संत सावळाराम महाराज म्हात्रे, आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या आशीर्वादाने आगरी महोत्सव २० वर्ष साजरा झाला. आगरी युथ फोरमचे सर्व पदाधिकारी, सदस्य, तरुण कार्यकर्ते आणि आगरी समाजासह इतर सर्व समाजाच्या पाठिंब्यामुळे यश मिळाले. राज्यात प्रथमच एका समाजाच्या संस्थेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा सन्मान मिळाला. समाजाचे आम्ही देणे लागतो, या भावनेतून आम्ही यापुढेही कार्य करीत राहणार आहोत. समाजाला प्रेरणा देणाऱ्या संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे भव्य स्मारक साकारण्यासाठी कार्य करणार आहोत, अशी भावना अध्यक्ष गुलाब वझे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात स्केटींगमध्ये कांस्यपदक पटकावणारा अर्णव भोईर, राष्ट्रीय पातळीवर मजल मारलेली जिम्नॅस्टिक खेळाडू चिन्मय प्रताप पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आगरी दर्पण दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. महोत्सवाचे ज्येष्ठ सदस्य शरद पाटील यांनी आठ दिवसांच्या महोत्सवाचे यशस्वीपणे सूत्रसंचालन केले. तर पांडुरंग म्हात्रे यांनी आभार मानले.