हा उत्सव स्थानिक कलेचे आणि परंपरेचे दर्शन घडवणारा एक मंच - दिलीप भोईर
डोंबिवली, ( शंकर जाधव ) : डोंबिवली जिमखाना माध्यमातून उत्तम प्रकारचे क्रीडापट्टू तयार होत आहेत. जिमखान्याच्या अनेक क्रीडापट्टूनी क्रीडाक्षेत्रात मोठी कामगिरी करून देशाचं नांव मोठं केले आहे. जिमखान्याच्या या उत्सवाला डोंबिवलीचे नव्हे तर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी शहरातून लोक भेट देत आहेत. या उत्सव - २०२४ विषयी माहिती देण्यासाठी रविवार १५ तारखेला डोंबिवली जिमखान्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेत अध्यक्ष दिलीप भोईर, सचिव पर्णाद मोकाशी, आनंद डीचोलकर आदी उपस्थित होते.डोंबिवली जिमखाना उत्सव हा फक्त मनोरंजनाचा नाही तर स्थानिक कलेचे आणि परंपरेचे दर्शन घडवणारा एक मंच आहे. हा उत्सव नवोदित कलाकारांसाठी संधी देत असतानाच, ग्राहकांसाठी एक मौजमजा लुटण्याचा 'अविस्मरणीय अनुभव देतो असे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी यावेळी सांगितले.
उदघाटन समारंभासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोर आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. शनिवार २१ डिसेंबर ते रविवार २९ डिसेंबरपर्यंत उत्सव संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही, डोंबिवली जिमखाना उत्सव २०२४ मोठ्या उत्साहाने आणि आनंदाच्या वातावरणात आयोजित केला जात आहे. डोंबिवली जिमखाना उत्सव हा फक्त मनोरंजनाचा नाही तर स्थानिक कलेचे आणि परंपरेचे दर्शन घडवणारा एक मंच आहे. हा उत्सव नवोदित कलाकारांसाठी संधी देत असतानाच, ग्राहकांसाठी एक मौजमजा लुटण्याचा 'अविस्मरणीय अनुभव देतो. उत्सवाचे हे २७ वे वर्ष, १९९७ साली उत्सवला सुरुवात झाली. उत्सव बद्दल सांगायची विशेष गोष्ट म्हणजे उत्सवचे आयोजन हे डोंबिवली जिमखान्याचे सभासद पूर्णतः स्वेच्छेने करत असतात आणि घरच्या कार्यासारखे आनंदाने पार पाडतात. गेल्या वर्षी प्रमाणेच उत्सवाचे ६०% स्टॉल्स तीन महिन्यापूर्वीच आरक्षित झाले होते आता सर्व स्टॉल हाउसफुल झाले आहेत.
उत्सवामध्ये नेहमीप्रमाणे गृह उपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, शैक्षणिक उत्पादने, परिधान, दागिने, कला वस्तू, खाद्यपदार्थ, नाविन्यपूर्ण उत्पादने, पुस्तके, बँका, आर्थिक गुंतवणूक,सामाजिक संस्था, पोलीस सायबर सिक्युरिटी अशा विविध रंगी उत्पादनांचे आणि सेवांचे दर्शन घडणार आहे. तसेच उत्सवमध्ये मनसोक्त फिरल्यानंतर उपलब्ध असणारे मनोरंजक खेळ आणि खानपान व्यवस्था ही लहान व थोरांसाठी आनंदाची सफरच असते आणि अशा प्रकारे उत्सव "सर्वांसाठी सर्वकाही” हे ब्रीदवाक्य नेहमीच सार्थकी ठरते.त्याशिवाय उत्सव मध्ये विविध आवडत्या मालिकेतील झी मराठीचे कलाकार आपल्या भेटीसाठी २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर या दिवसांमध्ये येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांस एक लक्ष फ्री पास देण्यात येणार आहेत त्याचा वापर विद्यार्थी आनंदाने घेतात व उत्सवमध्ये सहभागी होतात. तसेच दरवर्षी क्रीडाक्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा उत्सवमध्ये क्रीडापुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले जाते अशी माहिती डोंबिवली जिमखाना सचिव पर्णाद मोकाशी यांनी दिली.