वराठी ग्रामपंचायत अधिकारी निलंबित

 


 मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली कारवाई 


अलिबाग,  ( धनंजय कवठेकर  ) :  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनतेला सोयीसुविधा मिळाव्यात या अनुषंगाने १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यात येत आहे. तसेच कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महाड, पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्या आढावा शुक्रवारी (दि.१०) आयोजित केलेल्या बैठकीला गैरहजर राहणारे वराठी ग्रामपंचायत अधिकारी मोतिसिंग लहानुजी भस्मे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी निलंबित केले आहे. बैठकीला विनापरवानगी गैरहजर राहण्यासोबत भस्मे यांनी १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी करणे, प्रधानमंत्री आवास योजना कामात जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा या बाबींवर भर दिला जात आहे. उपक्रमांतर्गत शुक्रवारी महाड, पोलादपुर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, १५वा वित्त आयोग १०० टक्के खर्च करणे, स्वच्छ भारत अभियानातंर्गत करण्यात आलेली कामे यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी १०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. भरत बास्टेवाड यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांना दिल्या.


सदर आढावा सभेस महाड तालुक्यातील वराठी ग्रामपंचायत अधिकारी मोतिसिंग लहानुजी भस्मे हे विनापरवानगी गैरहजर राहिले होते. तसेच मोतिसिंग लहानुजी भस्मे यांनी १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी करणे, प्रधानमंत्री आवास योजना कामात जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने मोतिसिंग लहानुजी भस्मे यांना निलंबीत करण्यात आले आहे.


सदर आढावा सभेस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, महाडच्या गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पोलादपुरच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट, सहाय्यक गटविकास अधिकारी नामदेव आण्णा कटरे तसेच सर्व विस्तार अधिकारी, शाखा अभियंता उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post