डॉ. उदय निरगुडकर यांचे मत
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीत येथे 'मंथन व्याख्यानमाले' मधील दुसरा व शेवटचा कार्यक्रम टिळकनगर विद्यामंदिर शाळेच्या पटांगणात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते डॉ. उदय निरगुडकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजीत फडणीस व प्रसिद्ध सुलेखनकार व चित्रकार राम कस्तुरे असे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अनुराधा केळकर यांनी मधुर आवाजात गायलेल्या संपूर्ण वंदे मातरम् गीताने झाली. यावेळी आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या एका शपथेसाठी - स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी आपल्या रक्ताची आहुती दिली, तसे देशप्रेम आजही गरजेचे असल्याचे मत डॉ. उदय निरगुडकर यांनी मांडले.
व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी श्रीलक्ष्मीनारायण संस्थेचे संस्थापकीय संचालक, ज्येष्ठ कायदेविषयक सल्लागार माधव जोशी यांच्या नवीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या व्याख्यानमालेच्या निमित्ताने करण्यात आला. 'महाभारत ते भारत @२०२५' असे या पुस्तकाचे नाव असून इंग्रजी व मराठी भाषेत हे पुस्तक हेडविग मीडिया हाऊसतर्फे प्रकाशित झाले. हेडविग मीडिया हाऊसचे चिन्मय पंडित या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते.
डॉ. निरगुडकर सरांनी शिस्त हा विषय निवडत व्याख्यानाला सुरुवात केली. त्यांनी भेट दिलेल्या वेगवेगळ्या शाळा व भाषणांची अनेक उदाहरणं, अनुशासनासाठी दिली. शिस्त असली की ज्ञान येणार, असे मार्गदर्शन केले.जपानसारख्या देशांच्या प्रगतीचे कारण हे वैयक्तिक विजयापेक्षा सामूहिक विजयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे झाली किंवा होते. देशवासीयांमधे असलेली सांघिक भावना देशाला पुढे नेते. जगातल्या सर्वात जास्त परिणाम करणाऱ्या राजकीय भाषणांपैकी एक चर्चिल यांचे मानले जाते कारण अन्यायाविरुद्ध टिकून राहण्यासाठी आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहण्यासाठी प्रोत्साहित केले. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या एका शपथेसाठी - स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी आपल्या रक्ताची आहुती दिली, तसे देशप्रेम आजही गरजेचे आहे.
इंग्रजांनी भारतात फक्त राज्य केले नाही, तर भारताच्या समाजाची आणि अर्थव्यवस्थेची वाताहात केली. अनेक उद्योग नष्ट करत तब्बल ४५ ट्रिलियन डॉलर्सची एकूण लूट केली. इंग्रज व इतर परकीय आक्रमणांमुळे आज भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर्सची आहे. इंग्रजांनी आपली भाषा नष्ट केली आणि भारतीयांची मनं भ्रष्ट केली, आणि त्यामुळे आपला अभिमान संपला, असे निरगुडकर यांनी सांगितले.
स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटना डॉ. निरगुडकरांनी उलगडून सांगितल्या. अहिंसा हा जरी स्वातंत्र्याचा मूलमंत्र मानला गेला असला तरी केवळ अहिंसेतून स्वातंत्र्य मिळालेले नाही. इंग्रज सरकारने प्रत्येक उठावाला, लढ्याला आणि चळवळीला थोपवण्यासाठी विविध प्रकारची सुधारणांची पॅकेजेस देण्याचा प्रयत्न केला. १८५७ चा स्वातंत्र्यलढा, १८८३ मधे वासुदेव फडकेंचे निधन, १८८५ साली कॉंग्रेसची स्थापना, १९१३ ची गदर क्रांती या सर्व गोष्टींचा आढावा घेत माहित नसलेल्या आणि भारतीयांनी इंग्रांजांविरुद्ध केलेल्या विविध उठावांच्या, लढ्यांच्या आणि चळवळींच्या अभिमानास्पद इतिहासाची ओळख करुन दिली. "लेखण्या मोडा, बंदुका हाती घ्या", असे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लेबर पार्टीला मदत करून त्यांच्याकडून भारताच्या स्वातंत्र्याचे आश्वासन घेणारे द्रष्टे नेते लोकमान्य टिळक यांच्या दूरदृष्टीने भारताला स्वातंत्र्य मिळणे शक्य आणि सुलभ झाले असेही त्यांनी सांगितले. भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भारतात आय.टी., एफ. डी. आय. यांना वाव मिळाला, व सुझुकी ही कंपनी भारतात आली.
आज भारत हा जागतिक महासत्ता किंवा विश्वगुरू बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करीत आहे. भारताच्या विश्वगुरू बनण्याच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे भारताची झालेली माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील प्रगती. त्यामुळेच IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इनकम टॅक्स नसून “इंडिया'ज टुमॉरो”आहे, असे डॉ. निरगुडकर यांनी नमूद केले.
तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात नवनवीन संशोधन करणे हा भारतीयांचा मूळ स्वभाव आहे. काही वर्ष या मूळ स्वभावाला जणू ग्लानी आली होती आणि गेल्या दहा वर्षांत या स्वभावाचे पुन्हा अभ्युत्थान झाले असल्याचे प्रकर्षाने जाणवते असे निरागुडकरांनी सांगितले. गेल्या ८-१० वर्षात भारताने केलेल्या संशोधनातून आणि आजच्या तरुण पिढीत असलेली नवनवीन संशोधन करण्याची क्षमता आणि ईर्षा हे भारताला विश्वगुरू बनण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व सहभागी संस्थांच्या वतीने श्री माधव जोशी यांनी सर्व मान्यवरांचे, उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले आणि सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.