‘छावा’ चित्रपट करमुक्त करावा




आमदार सुलभा गायकवाड यांची मागणी


दिवा, ( आरती परब )  स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमी जीवनावर आधारित 'छावा' हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी केलेल्या अद्वितीय बलिदानाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. हा ‘छावा’ चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी आमदार सुलभा गायकवाड यांनी केली आहे.


छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो देशभक्तीची जाणीव जागृत करणारा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. त्यामुळे हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.


तथापि, चित्रपटगृहांमध्ये लागू असलेल्या करांमुळे सर्वसामान्य नागरिकांना हा ऐतिहासिक चित्रपट पाहणे कठीण होत आहे. जर ‘छावा’ चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) केला गेला, तर जनसामान्यांपर्यंत हा प्रेरणादायी इतिहास सहज पोहोचू शकेल. विशेषतः युवा पिढीला छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची जाणीव होईल आणि त्यांच्या विचारांशी त्यांची नाळ जुळेल.


या पार्श्वभूमीवर माननीय आमदा सुलभा गणपत गायकवाड यांच्यातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना निवेदन देण्यात आले असून, ‘छावा’ चित्रपट तातडीने करमुक्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. हा चित्रपट करमुक्त केल्यास महाराष्ट्रातील जनतेला आपल्या इतिहासाची जाणीव होईल आणि छत्रपती संभाजी महाराजांचे महान कार्य नव्या पिढीपर्यंत सुलभतेने पोहोचेल. तर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन ‘छावा’ चित्रपट करमुक्त करावा, अशी ही नम्र विनंती गायकवाड यांनी केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post