महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथमध्ये वाहतूक मार्गात बदल


  • ३५० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त
  • रांगेतून दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी घाटावर भव्य मंडळ

अंबरनाथ, ( अशोक  नाईक ) :  ९६५ वर्ष पुरातन अंबरनाथचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर हे 'भूमीज' शैलीतील महाराष्ट्रातील बहुतांश एकमेव मंदिर आहे. गेल्या काही वर्षांपासून महाशिवरात्री यात्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात जनसागर उसळत असतो. त्यामुळे महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने अंबरनाथ नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून नियोजित व्यवस्थापन करण्यात आले आहे. दरम्यान भाविकांची वाढती गर्दी पाहता, यावर्षी दर्शनाच्या रांगेत बदल करून शिवमंदिराच्या प्रवेश कमानी मार्गे घाट रस्त्यावर जाण्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आली असून पुढे रॅमच्या माध्यमातून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार असून दर्शन घेऊन शिवमंदिर कमानी मार्गे बाहेर पडता येणार आहे.



महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या व्यवस्थेमध्ये २ एसीपी सह ४ पोलीस अधिकारी, त्याचबरोबर ७ पीआय दर्जाचे अधिकारी, ३७ एपीआय,पीएसआय आणि जवळपास ३५० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. भाविकांनी मंदिराजवळ येण्यासाठी कोणत्याही वाहनाचा वापर करू नये, चेन-स्नॅचिंग सारख्या घटनांपासून सावध राहून महागडे सोने चांदीचे दागिने परिधान करू नयेत,तसेच पोलिसांना सहकार्य करावे. 

- शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबरनाथ



अंबरनाथच्या प्राचीन कालीन शिवमंदिराच्या महाशिवरात्रीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पूर्वी ही आठवडाभर चालणारी महाशिवरात्री यात्रा हळूहळू कालांतराने तीन दिवसांवर आली आहे. ठाणे ,मुंबई,रायगड,  पालघर, नाशिक परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक महाशिवरात्रीला दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे रस्त्यांवर अक्षरशः भाविकांचा जनसागर उसळत असतो. महाशिवरात्री यात्रेत नंतर शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची भर पडली आहे. त्यामुळे दूरवर नव्याने अंबरनाथची सांस्कृतिक ओळख होऊ लागली आहे. दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढत चाललेला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने पुरातत्व खात्याने दिलेल्या परवानगीनुसार शिवमंदिर परिसरात काशी-विश्वनाथ धर्तीवर सुशोभीकरण विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे. वालधुनी नदीच्या तीरावरील घाटाचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे या परिसराचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. 


२६ फेब्रुवारी रोजी मुख्य महाशिवरात्री दिवस आहे. २५ फेब्रुवारी मध्यरात्री जुने अंबरनाथ गावचे कोळी-पाटील पुजाऱ्यांकडून परंपरागत अभिषेक आरती नंतर भाविकांना मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यामुळे काही भाविक रात्रीपासूनच दर्शनाचा रांगेसाठी उभे असतात. त्यामुळे वाहतूक विभागाने शिवमंदिर परिसर आणि अंबरनाथ पूर्व भागातील वाहतूक मार्गात बदल केल्याबाबत वाहतूक विभागाने सूचना जाहीर केली. 




पूर्व भागातील लोकनगरी हिंदू स्मशानभूमी कडून गोविंद तीर्थ पुलाकडे जाणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांना 'प्रवेश बंद' केला जाणार आहे.पर्यायी या मार्गावरून सदर वाहने ही वडवली स्टेशन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौकामधून मटका चौका मार्गे पुढील इच्छित स्थळी जातील. तसेच काटई-कर्जत मार्गावरून वैभव हॉटेलकडून अंबरनाथ रेल्वे स्टेशन मार्गे मटका चौकापर्यंत येणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना वैभव हॉटेल येथून 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. वैभव वैभव हॉटेल येथून आनंदनगर एमआयडीसी, टी जंक्शन,फॉरेस्ट नाका, लादी नाका, डीएमसी चौक,मटका चौक अंबरनाथ पश्चिम भागातील रेल्वे स्टेशनला जातील. तर अंबरनाथ,बदलापूर औद्योगिक वसाहतीतील कामगारांना सोडण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी बसेस या एमआयडीसी ते टि जंक्शन मार्गे,फॉरेस्ट नाका, डीएमसी चौक मार्ग, महात्मा गांधी विद्यालय चौक येथून कामगारांना रेल्वे स्टेशन कडे जाण्याकरिता सोडून परत त्याच मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच मटका चौकाकडून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या सर्व जड- अवजड वाहनांना मटका चौक येथून 'प्रवेश बंद'बंद करण्यात येणार आहे. सदर सर्व जड-अवजड वाहने ही लादी नाका, फॉरेस्ट नाका, टी पॉईंट वैभव हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील. 



अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी व शिवाजीनगर कडून येणाऱ्या हलक्या वाहनांना रोटरी क्लब येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. तसेच कैलास कॉलनी उल्हासनगर कॅम्प नं. ५ कडून स्वामी समर्थ चौक अंबरनाथच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कैलास कॉलनी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गाने येणारी वाहने कैलास कॉलनी येथून पालेगाव मार्गे किंवा सुभाष टेकडी उल्हासनगर कॅम नं.४ कानसई कडून इच्छित स्थळी जातील.अंबरनाथचे प्राचीन कालीन शिवमंदिर हे उल्हासनगर आणि अंबरनाथच्या सीमारेषेवर आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातून शिवमंदिर परिसरात येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. 

      


उल्हासनगर अंबरनाथ दिशेने वाहतूक मार्गात बदल

अंबरनाथ पूर्व रेल्वे स्टेशनपासून स्वामी समर्थ चौक ,गोविंद तिर्थ पूल आदी परिसरात शिवमंदिर दिशेने दरवर्षी मोठी गर्दी होत असते.त्यामुळे वाहतूक शाखेने या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवार २५ फेब्रुवारी सायंकाळीपासून ते गुरुवार २७ फेब्रुवारीपर्यंत वाहतूक मार्गात बदल केल्यामुळे मंदिराच्या दिशेने प्रवास करताना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.


 

 कामगारांच्या संपामुळे पसरले कचऱ्याचे ढिगारे!

अंबरनाथच्या प्राचीन कालीन शिवमंदिराची महाशिवरात्री यात्रा खूप दूरवर प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या चार दिवसांपासून घंटागाडी कचरा उचल करणाऱ्या समीक्षा कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी वेतन न संप पुकारला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे झाले आहेत. लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन निष्प्रभ झाले आहे काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून होऊ लागला आहे. एकीकडे दुर्गंधी आणि कचराकुंडी निर्माण झाली आहे.तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी झळकवण्यात दंग झाले आहेत. दरम्यान पालिका प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणा वापरून पालिकेच्या यादीवर असलेले कंत्राटी जेसीबी आणि गाड्यांचा वापर करून कचरा उचलण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी दिली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post