अंबरनाथ, ( अशोक नाईक ) : अंबरनाथ नगरपालिकेचे पूर्व भागात स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात कै. य. मा. चव्हाण खुले नाट्यगृहात पालिकेचे वाचनालय होते. मात्र पालिकेने इमारत तोडल्यानंतर आणि पश्चिम भागात अंबरनाथ नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाच्या उभारणीत त्या ठिकाणी असलेले ग्रंथालय बंद पडल्याने पूर्व-पश्चिम भागातील वाचकांची वाचन भूक भागवण्यासाठी पूर्व भागातील वडवली येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे पालिकेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ तसेच मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकार्पण करण्यात आले. या ग्रंथालयात ४० हजाराहून अधिक पुस्तकांचा संच आणि विविध मासिके ठेवण्यात आली आहेत. या ग्रंथालयाचा नागरिकांनी आपल्या ज्ञान संचयात भर टाकण्याकरिता वापर करावा असे आवाहन अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी पश्चिम भागातील नालंबी येथील १ लाखाहून अधिक पुस्तकांचा संच असलेल्या शिवप्रेरणा ग्रंथालयाला ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी भेट दिली होती. यावेळी या ग्रंथालयाच्या व्यवस्थानाबाबत केतकर यांनी कौतुक केले होते. त्यातच आता दुग्ध शर्करा योगायोग जुळून आल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्व भागामध्ये सुसज्ज असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उभारण्यात आल्याने या भागातील विद्यार्थ्यांना, वाचकांना तसेच नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.