डोंबिवली / शंकर जाधव : इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये झी समूहातर्फे नुकताच मुंबई येथे ' झी युवा सन्मान २०२३ ' या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना ' युवा नेतृत्व ' पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने राज्यभरात सुरु असलेली लोकसेवेची कामे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विविध विकासकामांची दखल घेऊन खासदार डॉ. शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. झी एंटरटेमेंटचे चीफ क्लस्टर ऑफिसर (वेस्ट नॉर्थ अँड प्रीमियम) अमित शाह यांच्या हस्ते खासदार डॉ.शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण, आरोग्य, राजकीय , समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्य कर्तृत्वाने समाजात आपल्या कामाची मोहोर उमटवणाऱ्या आणि कधीही प्रकाशझोतात न येणाऱ्या नागरिकांना ' झी समुहा तर्फे ' विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. याच पद्धतीने झी समूहातर्फे विविध क्षेत्रात आपल्या कार्यातून जनसेवा करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यासाठी झी युवा सन्मान २०२३ या भव्य सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना युवा नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने राज्यभरात रुग्णसेवेबरोबरच अनेक जनसेवेची कामे सुरु आहेत. यामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात गेल्या काही वर्षात अनेक विकास कामे झाली आहेत. अनेक विकास प्रकल्प प्रगतीपथावर आहे. खासदार डॉ. शिंदे यांची विविध माध्यमातून सुरु असलेल्या जनसेवेच्या कार्याची दखल घेत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना युवा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्काराचे श्रेय स्वयंसेवकांचे डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या सर्व स्वयंसेवकांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याच्या भावना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पुरस्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना केल्या. राज्यभरात या दोन्ही मदत कक्षांतर्फे गरजू नागरिकांची आणि रुग्णांची सेवा केली जाते. गरजू रुग्णांना योग्य पद्धतीचे उपचार मिळवून देण्यासाठी सर्व स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेत असतात. यामुळे या पुरस्काराचे खरे मानकरी ते आहेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर विविध क्षेत्रात आपल्या कार्यातून जनसेवा तसेच राष्ट्रसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना झी समूहाने या पुरस्काराच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. यामुळे अनेकांना समाजासाठी उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.