मुंब्र्यातील उम्मीद फाउंडेशनच्या पथकाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव

 


दिवा / आरती मुळीक परब : - मुंब्रा उम्मीद फाऊंडेशनने लष्करी भरतीसाठी आलेल्या युवकांसाठी केलेल्या कौतुकास्पद कामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने एम. एम. व्हॅली येथील उम्मीद स्कूलमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ज्येष्ठ नगरसेवक राजन कीणे होते. यावेळी शाळेतील विशेष मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरवदे सुभेदार, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी प्रवीण गोविंद सुभेदार, रोटरी क्लब ठाणेच्या सदस्या व प्राध्यापिका उषावती शेट्टी, उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष परवेझ फरीद आदी उपस्थित होते. उमेद फाऊंडेशनच्या चमूने केलेले हे कौतुकास्पद काम पाहून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 उम्मीद फाऊंडेशनच्या युवा स्वयंसेवकांनी मानवतेचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. याशिवाय सैन्यात भरती होण्यासाठी आलेल्या तरुणांना सोयी सुविधां करिता अनेक प्रयत्न केले, या कार्याची दखल घेत आज त्यांचा जिल्हा दंडाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

फाउंडेशनचे फरीद यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सैनिक भरतीसाठी जाहीर केलेल्या योजनेतर्गत 20 सप्टेंबरपासून कौसा, मुंब्रा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये भारतीय सैन्यात भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून ती 10 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यांच्या मुक्कामाची पर्यायी व्यवस्था प्रशासनाकडून जवळपासच्या शाळा आणि इतर ठिकाणी करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व आदींची योग्य सोय नसल्याने भरतीसाठी आलेल्या युवक- युवतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत दररोज 2 ते 3 हजार तरुणांची गर्दी होती. ते सर्व स्टेडियमच्या बाहेर जमले होते. त्या तरुणांना नंबर येईपर्यंत तासनतास स्टेडियमच्या बाहेर वाट पाहावी लागत आहे. स्टेडियमच्या दिशेने जात असताना त्यांना तेथे आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. तरूण मोठ्या संख्येने येत होते, मात्र संख्येनुसार जेवण, पिण्याचे पाणी व इतर अनेक सुविधा नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सर्व समस्या पाहून उम्मीद फाऊंडेशनच्या टीमने अग्निवीर बनण्यासाठी आलेल्या तरुणांना खाण्यापिण्याची, औषधांसाठी पुढे येऊन त्यांची सेवा केली.

Post a Comment

Previous Post Next Post