महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नाना यश
डोंबिवली ( शंकर जाधव ) काही दिवसांपूर्वी डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळ परिसरात दोन म्हशींना उघडया डीपीतील वायरचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा आरोप मालकाने केला होता. डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी उघडे डीपी असल्याने नागरिकांना शॉक लागल्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीचे कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याने अखेर मनसेने पुढाकार घेऊन उघड्या डीपींना लवकरात लवकर झाकण लावावे याकरता पाठपुरावा सुरू केला.
एमआयडीसी विभागात बरेच ठिकाणी इलेक्ट्रिक डीपीला झाकणे चोरीला गेल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.वेळीच या वर उपाय योजना करणे गरजेचे होते. कारण या विभागात शाळा, रुग्णालय असून सतत लोकांची रहदारी मोठया प्रमाणात असते. कोणता ही अनुचित प्रकार घडु नये याची खबरदारी घेणे गरजेचे होते. त्या संदर्भात मनसेचे विभागअध्यक्ष संजय चव्हाण, उपविभाग अध्यक्ष सचिन माने, शाखा अध्यक्ष सतीश पाटील आणि शरद कोंडाळकर यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला.
उघड्या डीपींना झाकणे लावावीत याकरिता अधिकारी हटकर यांना निवेदन देण्यात आले होते. मनसेच्या पाठपुराव्याला यश येऊन इलेक्ट्रिक डिपींना झाकणे बसवण्यात आली.