मराठी साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी आणि लेखक नामदेव धोंडो महानोर यांचे निधन

 


पुणे: मराठी साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी आणि लेखक नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धो. महानोर यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या म्हणजेच शुक्रवारी पळसखेड या मूळ गावी ना. धो. महानोर यांच्यावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने सर्व स्तरावर हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील पळसखेडा या मूळ गावी नामदेव धोंडो महानोर यांच्यावर उद्या संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महानोर यांच्या निधनामुळं खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे. महानोर हे रानकवी म्हणून प्रसिद्ध होते. पानझड, ‘तिची कहाणी' आणि ‘रानातल्या कविता' या कवितासंग्रहातून त्यांनी मराठवाड्यातील लोकगीतं प्रसिद्ध केली होती.

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन, ग्रामीण संस्कृतीचे वैभव मराठी साहित्यात आणले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

Post a Comment

Previous Post Next Post