भाजपकडून पाणी टँकर पुरवठा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठाणे जिल्ह्यात आनंदाची बातमी मिळाली की बारवी धारण ओव्हरफ्लो झाले. आता वर्षभर पाण्याची चिंता मिटली असे म्हटले जात असले तरी काहींना अजूनही पाणी मिळेनासे झाले आहे. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर व त्रिमूर्तीनगर परिसरातील नागरिकांची घागर रिकामीच राहिली. ही परिस्थिती पाहून भाजपा या नागरिकांच्या मदतीला धावून आली. या नागरिकांना मोफत पाणी टँकर पुरवठा करून काही दिवसनांकरता दिलासा दिला.गोर-गरिबांना पाण्यासाठी वंचित ठेवू नका. जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पालिका प्रशासन विरोधात उग्र हंडा मोर्चा आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजप कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे व राजू भाई शेख यांनी दिला आहे.
याबाबत कांबळे म्हणाले, महाराष्ट्रमध्ये सर्व ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिका सारख्या आणि डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शेलार चौक इंदिरानगर त्रिमूर्ती नगर या भागामध्ये गेले अनेक दिवस पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. भाजपा पदाधिकारी शशिकांत कांबळे व राजू भाई शेख यांनी खूप दिवस प्रयत्न करून इंदिरानगरमधील व त्रिमूर्ती नगरमधील पाणी व्यवस्थित यावे याकरिता महानगरपालिकेचे अधिकारी यांना जागेवरती नेऊन त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. इंदिरानगरमध्ये पाण्याचा थेंब देखील येत नसल्याने नागरिकांना टॅंकरने पाणी भरण्याची पाळी आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने यामध्ये सुधारणा केली नाही तर हंडा मोर्चा आंदोलन लवकरात लवकर काढण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.