मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्स संघात लसिथ मलिंगाची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तो शेन बाँडची जागा घेणार आहे. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्समध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून तो काम करत होता. मलिंगाने मुंबई इंडियन्ससाठी एकूण १३९ सामन्यांमध्ये १९५ बळी घेतले आहेत. यापैकी १७० विकेट आयपीएलमध्ये घेतल्या आहेत.
शेन बाँड २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सशी जोडला गेला होता. प्रथम महेला जयवर्धने आणि नंतर रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली त्याने संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या मोसमातही (२०१५) मुंबईचा संघ चॅम्पियन ठरला. अशा परिस्थितीत आता बऱ्याच दिवसांनी शेन बाँडने मुंबई इंडियन्सला निरोप दिला आहे. आयपीएल २०२४ च्या हंगामापूर्वी मलिंगा हा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये दाखल होणार आहे. मलिंगा २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सशी जोडला होता. आता तो मुंबई इंडियन्ससोबत आपली दुसरी इनिंग सुरू करणार आहे.
३९ वर्षीय लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सचा मेंटॉर म्हणून २०१८ मध्ये काम पाहिले आहे. मात्र तो २०१९ च्या आयपीएल हंगामात मैदानावर परतला आणि जसप्रीत बुमराहसोबत मुंबईला विजेतेपद पटकावले. मलिंगा मुंबई इंडियन्सकडून खेळत होता त्यावेळी मुंबईने चारवेळा विजेतेपद पटकावले. याचबरोबर मलिंगा संघात असाताना मुंबईने चॅम्पियन्स लीग टी २० चे टायटल देखील जिंकले होते.