कलारंग ढोल-ताशा पथकातर्फे 'गणरायाची वारी' उपक्रम
डोंबिवली ( शंकर जाधव) : कलारंग प्रतिष्ठान ढोल-ताशा पथकातर्फे डोंबिवली मधील घरगुती गणपतींसाठी सामूहिक विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचे नाव 'गणरायाची वारी' असून या वर्षी देखील २५ सप्टेंबर २०२३ रोजी फडके रोड येथे सात दिवसांच्या गणपतीसांठी हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. गेली ३ वर्षे कलारंग प्रतिष्ठान हा उपक्रम राबवत असल्याने आता कोकणाप्रमाणेच आपल्या डोंबिवली मध्ये सुद्धा घरगुती गणपतींच्या एकत्र विसर्जनाची परंपरा रुजायला सुरुवात झाली आहे.
या उपक्रमात सहभागी कटुंबांसाठी कलारंग ढोल ताशा पथकाचे सादरीकरण होते, यात्रेत सहभागी झालेल्या घरगुती गणपतींना आपला गणपती ठेवण्यासाठी विशेष गाडीची व्यवस्था केली जाते, गणरायाच्या गाडीची सजावट सुद्धा अनोख्या पद्धतीने होते, सहभागी होणाऱ्या कटुंबाना पारंपरिक लेझीम आणि बर्ची नृत्याचा आनंद घेता येतो आणि मिरवणुकीच्या शेवटी साधारण १५० ते २०० लोकांसह ढोल ताशाच्या गजरात महाआरती केली जाते. उत्सव सर्वानी एकत्र येऊन साजरा करावा इतकाच या यात्रेचा उद्देश असल्याने सहभागी होणाऱ्या कटुंबांकडून कोणत्याही पद्धतीचे शुल्क आकारण्यात येत नाही.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याच ठिकाणी घरघुती गणेश उत्सव मोजक्या लोकांमध्ये साजरा होताना दिसतो. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची गर्दी इतकी वाढली आहे की नावाला जरी सार्वजनिक असलं तरी उत्सव फक्त मंडळाचाच. ज्या काळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची प्रथा सुरु केली तेव्हापासून सार्वजनिक गणेश उत्सवाचं चित्र प्रचंड बदललं. आज शहरातल्या गणेश उत्सवात विभक्त कुटुंबातील घरात जेमतेम ४ ते ५ लोकं गणेश विसर्जनासाठी बाहेर पडतात, एकाच्या हातात गणपती, दोन मोजके घोषणा देणारे आणि एक टाळ वाजवणारा. उत्सवाच्या या बदलत्या चित्रात एक समाज म्हणून आपण एकमेकांपासून दुरावल्याची जाणीव होते. याला पर्याय म्हणून आम्ही वादक मंडळींनी आमच्या कलेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणायचा प्रयत्न म्हणून गणरायाची वारी उपक्रम सुरु केला. उत्सव साजरा केल्यास त्याचा आनंद द्विगुणित होतो त्यामुळे सर्वांनी गणरायाची वारी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कलारंग प्रतिष्ठान मधील मंडळींनी केले आहे.
२५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता या मिरवणुकीची सुरुवात होईल आणि त्या पुढे साधारण २ तास हि मिरवणूक चालेल. फडके रोड येथील गणेश मंदिरापासून यात्रेची सुरुवात होईल आणि तेथून पुढे मदन ठाकरे चौक, ब्राम्हण सभा ते नेहरू मैदानास शेवट असा यात्रेचा मार्ग असेल. कल्याण - डोंबिवली परिसरातील कुटुंब यात सहभागी होऊ शकतात. सहभागी होण्यासाठी आणि कार्यक्रमाचे सविस्तर स्वरूप जाणून घेण्यासाठी आपण ८८९८६११२९३ या क्रमांकावर संपर्क करू शकता.