- एक महिन्याचा इशारा देत आंदोलन मागे
नाशिक: नाशिक जिल्ह्यासह अहमदनगरात व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कांदा लिलाव १३ दिवसांपासून बंद करण्यात आला होता. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी करावे ही प्रमुख मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्याबाबत पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सोमवारी कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी पुढील१३ दिवसांमध्ये व्यापाऱ्यांवर बाजार समितीने केलेल्या कारवाया मागे घेण्यात येतील अशी घोषणा केली. तसेच याबाबत जिल्हा उपनिबंधक सकारात्मक निर्णय घेतील असे देखील यावेळी दाद भुसे यांनी यावेळी म्हटले. या बैठकीनंतर कांदा व्यापाऱ्यांनी बंद मागे घेत मंगळवारपासून नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत पुन्हा एकदा कांदा लिलाव सुरू होणार आहे.
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यामुळे राज्यातील राजकारण देखील पेटले होते. केंद्र आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही लिलाव पुन्हा सुरू करणार नाही, अशी भूमिका कांदा व्यापाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे शेतकरीवर्ग देखील चिंतेत सापडला होता. दरम्यान यासाठी कांदा व्यापारी, शेतकरी संघटनांची बैठक देखील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली होती. पण या बैठकीमध्ये देखील कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आला नाही. एक महिन्याच्या आत आमच्या अडचणी केंद्र आणि राज्य सरकारने सोडवाव्यात असा थेट इशारा या कांदा व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
गणेश विसर्जनाचा मुहूर्त साधत विंचुर बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले. बंदनंतर पहिल्याच दिवशी ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त २४०० रुपये दर मिळाला होता.