भारतीय महिलांनी कसोटीत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली



तब्बल आठ गडी राखून धुव्वा उडवला

मुंबई: भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा तब्बल आठ गडी राखून धुव्वा उडवला आहे.  स्नेह राणाला सर्वाधिक सात गडी बाद केल्याबद्दल प्लेअर ऑफ द मॅच म्हणून घोषित केले. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला गेला. रविवारी (२४ डिसेंबर) सामन्याच्या चौथ्या दिवशीच भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ५ बाद २३३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे ४६ धावांची आघाडी होती. कांगारूंचा संघ चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात २६१ धावांवर सर्वबाद झाला. त्यांना एकूण ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे भारताला विजयासाठी ७५ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने हे लक्ष्य सहजरित्या पार केले. दोन्ही संघांमध्ये १९७७ पासून आतापर्यंत ११ कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. सहा कसोटी अनिर्णित राहिल्या आणि आता भारताला एक विजय मिळाला. भारताकडून पूजा वस्त्राकरने ४ आणि स्नेह राणाने ३ बळी घेतले.


ऑस्ट्रेलियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१९ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ४०६ धावा केल्या. अशा प्रकारे भारताकडे पहिल्या डावात १८७ धावांची आघाडी झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २६१ धावा करता आल्या.  ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ताहिला मॅकग्राने सर्वाधिक ७३ धावा केल्या. यानंतर एलिस पॅरी ४५ आणि बेथ मुनी ३३ धावा करून बाद झाल्या. कर्णधार एलिसा हिलीने ३२ आणि फोबी लिचफिल्डने १८ धावा केल्या. हे चार फलंदाज तिसऱ्या दिवशी तंबूत परतल्या होत्या.

कांगारू संघाला आज खेळाच्या चौथ्या दिवशी पहिला धक्का ऍशले गार्डनरच्या रूपाने बसला. २७ चेंडूत ७ धावा करून ती बाद झाली. पूजा वस्त्राकरच्या चेंडूवर ती एलबीडब्ल्यू झाली. तिच्यानंतर  सदरलँड २७ धावा करून स्नेह राणाची शिकार झाली.

त्यानंतर स्नेहने एलाना किंगला (०) क्लीन बोल्ड केले. राजेश्वरी गायकवाडने लॉरेन चीटलला (४ धावा) बाद करून ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला. गायकवाडने ॲशले गार्डनरला (९ धावा) बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला.  भारताकडून स्नेह राणाने दुसऱ्या डावात ४ विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी २ विकेट मिळाले. पूजा वस्त्राकरने १ विकेट घेतली.




Post a Comment

Previous Post Next Post