सायकलप्रेमींची नाताळ विशेष सायकल राईड

 


नव्या वर्षात फिट आणि हिट राहण्याचा दिला संदेश

ठाणे, : आम्ही  सायकलप्रेमी फाऊंडेशन आणि १९८ वर्षांचे सेंट जेम्स चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने नाताळ निमित्त ख्रिसमस स्पेशल सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. या राईडमध्ये ठाणे, मुंबई, कल्याण, डोबिवली, भिवंडी या भागांतील ८० हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता. १० वर्षांच्या चिमुकलीपासून ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले होते. तसेच, चर्चचे युवा सभासदांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. सायकल चालवून फिट आणि हिट राहण्याचा तसेच, पर्यावरण जपण्याचा नव्या वर्षाचा संकल्प या सायकलप्रेमींनी दिला.

सकाळी ७ वा. कॅडबरी जंक्शनपासून सायकल राईडला सुरूवात झाली ती मुल्ला बाग बसस्थानकाच्या इथून परत येऊन सेंट जेम्स चर्च येथे सकाळी ८ वा. समाप्त झाली. या राईडचे नेतृत्व प्रा. सुनील भुसारा, अंजली सिंग, पंकज रिजवानी, आशिष डांगे यांनी केले. राईडनंतर सेंट जेम्स चर्चचे फादर राजेंद्र भोंसले, आम्ही  सायकलप्रेमी फाऊंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांच्या हस्ते तर सेंट जेम्स चर्चचे सचिव जीवन खरात, ज्येष्ठ सायकलप्रेमी प्रा. सुनील भुसारा, चर्चचे ज्येष्ठ सभासद संदेश हिवाळे यांच्या उपस्थितीत सहभागी सायकलप्रेमींना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सायकल हे महत्त्वाचे माध्यम आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबर आरोग्याचे संतुलनही राखले जाते. सायकल चालविण्याची आजच्या काळात नितांत गरज आहे. आम्ही  सायकलप्रेमी फाऊंडेशनने सायकलच्या माध्यमातून हाती घेतलेले सामाजिक कार्य अविरत चालू राहू दे अशा शब्दांत फादर भोसले यांनी सदिच्छा दिल्या. प्रज्ञा म्हात्रे यांनी संस्थेची माहिती देत सर्व सायकलप्रेमींना सोबत घेऊन ही चळवळ महाराष्ट्रात राबवण्याचा मानस व्यक्त केला. तसेच, सेंट जेम्स चर्च हे दोन वर्षांनी २०० वर्षांचे होत आहे. ही ऐतिहासिक वास्तू असल्याचे नमूद केले. दरम्यान, नाताळ फराळाचा सर्व सायकलप्रेमींंनी आस्वाद घेतला. यावेळी या ऐतिहासिक चर्चची माहिती सायकलप्रेमींनी आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून संकलित केली. संस्थेचे सदस्य अजय नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेचे सदस्य विनोद फर्डे, अतुल मालुसरे यांनी संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post