भारतीय तिजोरीत परकीय चलनाचा साठा वाढला

महिनाभरात ९.११ अब्ज जमा

मुंबई : रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी परकीय चलनाच्या (foreign currency) साठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, परकीय गुंतवणुकीतील वाढीमुळे परकीय चलन साठा वाढला आहे. १५ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा ९.११ अब्जने वाढून ६१५.९७ अब्ज डाॅलरवर गेला आहे. 

या कालावधीत परकीय चलनाच्या मालमत्तेत वाढ झाली असून ती ८.३४ अब्ज डॉलर्सनी वाढून५४५.०४ अब्ज डॉलर झाली आहे.  नवीन वर्षात विदेशी गुंतवणुकीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताच्या परकीय चलनाचा साठा चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. 

आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे. आरबीआयचा सोन्याचा साठा ४४६ दशलक्ष डाॅलरने वाढून ४७.५७ अब्ज डाॅलर झाला आहे. एसडीआर १३५ दशलक्ष डाॅलरने वाढून १८.३२ अब्ज डाॅलर झाला. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील राखीव साठा १८१ दशलक्ष डाॅलरने वाढून ५.०२ अब्ज डाॅलर झाला.

परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे परकीय गुंतवणुकीत झालेली वाढ. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ न करण्याच्या निर्णयानंतर आणि २०२४ मध्ये व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर देशात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. 

ऑक्टोबर २०२१ मध्ये परकीय चलनाचा साठा ६४५ अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता, त्यानंतर मोठी घसरण झाली होती. आता परकीय चलनाचा साठा त्यांच्या जुन्या उच्चांकापासून ३० अब्ज डॉलर्स दूर आहे. गेल्या वर्षीपासून, सेंट्रल बँकेने रुपया उचलण्यासाठी परकीय चलन साठा खर्च केला होता. त्यामुळे साठ्यात घट दिसून आली.

Post a Comment

Previous Post Next Post