नोंदणी, खरेदी आणि शुल्कभरणा करण्याची सुविधा
पोर्टलचा नवी दिल्लीत शुभारंभ
नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह (amit shaha) यांनी आज तूर डाळ उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी, खरेदी आणि शुल्कभरणा करण्याची सुविधा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) ने तयार केलेल्या पोर्टलचा नवी दिल्लीत शुभारंभ केला. या पोर्टलच्या माध्यमातून डाळ विकून उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे.
या पोर्टलद्वारे शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतात आणि बाजारभावाने विकू शकतात. सध्या पोर्टलवर तूरडाळ विकली जाऊ शकते. लवकरच उडीद आणि मसूर तसेच मका उत्पादक शेतकऱ्यांसाठीही अशीच सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.अमित शहा यांनी चाचणीचा भाग म्हणून पोर्टलद्वारे २५ तूर विक्रीदारांच्या खात्यात सुमारे ६८ लाख रुपये पाठवले असल्याचे देखील स्पष्ट केले
सहकारी दोन केंद्रीय नोडल एजन्सी म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड डाळींचा 'बफर स्टॉक' राखण्यासाठी सरकारच्या वतीने डाळींची खरेदी करतात. जेव्हा डाळींच्या किंमती एमएसपीच्या खाली जातात, त्यावेळी या एजन्सी योग्य भावाने डाळ खेरदी करत असतात.
या पोर्टलच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांची समृद्धी, डाळींच्या उत्पादनातील देशाची स्वयंपूर्णता आणि पोषण मोहिमांना बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजची ही सुरुवात आगामी काळात देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठे बदल घडवून आणण्याची सुरुवात असल्याचे शहा यांनी म्हटले. शेतकऱ्यांना डाळींची लागवड करण्यापूर्वी नाफेड आणि एनसीसीएफच्या वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. पिकाच्या उत्पादनानंतर शेतकरी त्यांची तूरडाळ एमएसपीवर ऑनलाइन पोर्टलवर विकू शकतात. शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या डाळीचे पैसे दिले जातील. जर डाळींची किमत एमएसपीपेक्षा जास्त असेल तर सरकारकडून जास्त किमत देण्याचे सूत्र तयार करता येईल असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
कडधान्यांची लागवड कमी झाल्याने हे पोर्टल सुरू करण्यात आले. २०२३-२४ वर्षात दूर डाळीचे उत्पदनात सलग दुसऱ्या वर्षी घट होण्याचा अंदाज आहे. २०१६- २०१७ खरीप हंगामात पिकांची ४८.७ लाख टन तूर विक्री झाली. त्यानंतर २०२२-२३ मध्ये तूर उत्पादनात घट झाल्याचे पाहायला मिळाली. या काळात ३३.१ लाख टन तूरीचे उत्पादन झाले. यावर्षी तूर उत्पादन ३४.२ लाख टन मिळण्याची शक्यता आहे.