उल्हासनगर : उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी शहरातील मुख्य रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी विक्रेते त्यांची वाहने रस्त्यावर ठेवत असल्यामुळे तसेच बेवारस वाहनांमुळे रहदारीस अडथळा होत असल्याचे निदर्शनास आले होते. महानगरपालिका क्षेत्रात बेवारस वाहन पडून असल्यामुळे शहरातील नागरीकांच्या व लोकप्रतिनिधी यांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे बेकायदेशीर बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त (शहर) जमीर लेंगरेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणो मुख्य रस्त्यांवर मोठया संख्येने पडून असणाऱ्या बेकायदेशीर बेवारस वाहनांवर शहर वाहतूक शाखा, संबंधित पोलीस स्टेशन व सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती क्र. १ ते ४, उल्हासनगर महानगरपालिका, यांनी संयुक्त धडक कारवाई सुरू केली आहे. सदर विशेष मोहिमेत दंडात्मक कारवाईपोटी रु. १४,०००/- एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच एकूण १३ बेवारस वाहने हटविण्यात आलेली आहेत.