पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन

  


शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख लांडगे यांचीही उपस्थिती

 ६५ हजार पुस्तकांनी बनवलेले राम मंदिर प्रेक्षकांसाठी खुले

डोंबिवली ( शंकर जाधव ) : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले.डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलमधील बंदिस्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रवी पाटील,भाजप माजी नगरसेवक मंदार हळबे, पै फ्रेंड्स लायब्ररी संचालक पुंडलिक पै, दीपाली काळे, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत नेहते, अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे योगेश जोशी, मीना गोडखिंडी, भूषण पत्की आदी उपस्थित होते.६५ हजार ५००  पुस्तकांनी बनवलेले राम मंदिर प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले.

    यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांसह उपस्थित मान्यवरांनी पुस्तक प्रदान सोहळ्यात उभारलेल्या पुस्तकांनी बनविलेल्या श्रीराम मंदिराची पाहणी केली.यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले,  पुस्तक आदान प्रदान सोहळ्यात  शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी घेणे आवश्यक आहे.तर शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, वाचनसंस्कृती जपण्यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीकडून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पुस्तक आदान प्रदान उपक्रमाची कीर्ती भारतभर पसरली आहे.डिजिटल युगात वाचकांसाठी पुंडलिक पै यांची पै फ्रेंड्स लायब्ररी उत्कृष्ट काम करीत आहे.तर उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे या सोहळ्याला नक्की भेट देणार आहेत.

      आदान-प्रदान सोहळ्यात आपल्याकडील  पुस्तक देऊन दुसरे एखादे नवीन पुस्तक घेऊन जाता येईल असा हा उपक्रम आहे.  या सोहळ्याचे हे दहावे वर्ष असून तरी पै फ्रेंड्स लायब्ररी, कल्याण डोंबिवली महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहाय्याने  हा उपक्रम राबवण्यात येतो. यावर्षी या उपक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक हातभार लावला असून विद्यार्थ्यांनी आणि वाचकांनी याचा लाभ घ्यावा आणि सांस्कृतिक डोंबिवलीत ज्ञानाची देवाण घेवाण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवत आहोत अशी माहिती पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post