Bitcoin Fraud Case : राज कुंद्रांची ९७ कोटींची संपत्ती जप्त

मुंबईशिल्पा शेट्टीचा पती, उद्योगपती आणि अभिनेता राज कुंद्रावर (Raj kundra) ६६०० बिटकॉइन फसवणूक प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. ईडीने राज कुंद्राची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून त्यात जुहू येथील फ्लॅट आणि पुण्यातील बंगल्याचाही समावेश आहे. 

रिपू सुदान कुंद्रा उर्फ ​​राज कुंद्रा यांची सुमारे ९७.७९ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे, असे ईडीने ट्विट केले आहे. पीएमएलए, २००२ च्या तरतुदीनुसार, राज कुंद्राची ही मालमत्ता संलग्न करण्यात आली आहे. यामध्ये जुहू येथील फ्लॅटचाही समावेश आहे, जो सध्या राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावावर आहे. राज कुंद्राच्या नावे असलेले इक्विटी शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत. सध्या क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवसाय करणे भारतात बेकायदेशीर असल्याची माहिती आहे. पण राज कुंद्राने बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवसाय करून व्यवहारात फेरफार केल्याचा आरोप आहे.

ईडीने महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या वतीने वन व्हेरिएबल टेक पीटीई लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने तपास सुरू केला होता. दरमहा १० टक्के परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन बिटकॉईनच्या रूपात लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आरोपींवर आहे.

 गुंतवणुकदारांची फसवणूक आणि अस्पष्ट ऑनलाइन वॉलेटमध्ये बेकायदेशीरपणे मिळवलेली बिटकॉइन लपवून ठेवल्याचा आरोप ईडीने केला आहे. शिल्पा शेट्टी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. त्याचवेळी तिचा पती राज कुंद्रानेही फिल्मी दुनियेत प्रवेश केला आहे. राज कुंद्राने गेल्या वर्षी 'UT69' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.



Post a Comment

Previous Post Next Post