नवी मुंबई : 'ज्ञान हीच शक्ती' या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीवर आधारित नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली येथे उभारलेले भव्यतम स्मारक हे 'ज्ञानस्मारक' म्हणून नावाजले जात आहे. आज बाबासाहेबांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी याठिकाणी ज्ञानसूर्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ज्ञानस्मारकाला भेट देत बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले तसेच जयंतीनिमित्त स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची पाहणी केली. २०१५ मध्ये ५ डिसेंबरला स्मारकातील सुविधा लोकार्पण झाल्यानंतर या स्मारकाकडे नागरिकांचा सातत्याने ओढा राहिला असून मागील सव्वा दोन वर्षात २ लाख ५७ हजार ३४० इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी नोंद करून या ठिकाणी भेट देत आगळेवेगळे स्मारक म्हणून या स्मारकाची प्रशंसा केली आहे. आजही बाबासाहेबांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सायं. ४ पर्यंत कडक उन्हाळा असूनही साडेआठ हजारहून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट देत डॉ. बाबासाहेबांच्या ज्ञानस्मृतींना अभिवादन केले आहे तसेच स्मारकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. संध्याकाळनंतर व रात्री नागरिकांचे कुटुंबासमवेत स्मारकाला भेट देण्याचे प्रमाण अधिकच वाढणार आहे.
स्मारकातील समृद्ध ग्रंथालयात ५२८२ इतक्या मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले व बाबासाहेबांसह इतर महनीय पुरुषांच्या चरित्रावर आधारित मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध असून ऑडिओ व्हिज्युअल इ- लायब्ररी सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे हे ग्रंथालय म्हणजे सर्वसामान्य वाचकांप्रमाणेच अभ्यासकांसाठीही ज्ञानसमृद्ध असा ठेवा आहे. या ठिकाणचा 'विशेष संविधान कक्ष' संविधानाची महती मनामनात रुजवण्यासाठी उपयोगी आहे. या ठिकाणी होणाऱ्या 'विचारवेध' व 'जागर' या व्याख्यानमालेत वाचन संस्कृतीचा व्यापक प्रसार करतात.
डॉ. बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मिळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष छायाचित्र दालन हे स्मारकाचे खास आकर्षण असून त्यामधून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची संधी देणारा अत्याधुनिक होलोग्रफिक प्रेझेंटेशन शो भारावून टाकतो. याशिवाय एकाच वेळी २०० व्यक्ती ध्यान करू शकतील, असे भव्य ध्यान केंद्र वेगळी अनुभूती देते. अशा विविध वैशिष्ट्यांमुळे हे ज्ञानस्मारक सर्वांचेच आकर्षण केंद्र झाले असून या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांचे शिक्षण व ज्ञानातून प्रगतीचे विचार जनमानसात प्रसारित होत आहेत.