डोंबिवली ( शंकर जाधव ) : बकरी ईदच्या दिवशी हिंदू बांधवाना दुर्गाडी येथील दुर्गामाता मंदिरात प्रवेश बंदी केली जाते. त्या निषेधार्थ शिवसैनिक या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर घंटानाद करण्यासाठी जमा होत असतात. या बंदीला विरोध करण्यासाठी जमलेल्या शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट हे एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ३८ वर्षांपूर्वी १९८६ च्या दशकात या घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली होती. बकर ईद दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावर बंदी असल्याने शिवसैनिक घंटानाद करतात. सोमवारी कल्याणच्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याकडे निघाले होते. मात्र पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटांना लालचौकी परिसरातच बॅरीकेट लावून रोखून धरले. ज्याठिकाणी काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ धक्काबुक्कीही झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात होती.
यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे आंदोलन त्यांच्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी २० वर्षे कायम ठेवले आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.
तर शिवसेना ठाकरे गटाचे विजय साळवी म्हणाले, सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली अनेक वर्षे या घंटानाद आंदोलनाचे नेतृत्व केले. आणि आज त्यांचे सरकार असताना ते मुख्यमंत्री असताना त्यांचेच प्रशासनाचे अधिकारी आज किल्ल्यावर बंदीचा आदेश काढत आहेत. यावरून हे डुप्लीकेट हिंदुत्ववादी सरकार असून आम्ही त्याचा निषेध करत करतो.