वाचन व संस्कृती विषयावर ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे यांचे कन्या शाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन
अलिबाग, (धनंजय कवठेकर) : समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महावाचन उत्सव २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अलिबाग शहरातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जा. र. ह. कन्या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वाचन व संस्कृती या विषयावर उपस्थित विद्यार्थिनींना ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे यांनी मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या मुलांना लहान वयापासून मराठी भाषेची गोडी लागण्यासाठी विशेषतः शालेय शिक्षणातील घटक व घराघरातील पालक यांची भूमिका तर अत्यंत महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधित घटकांनी काम केले पाहिजे ही खरी आजची गरज व आव्हान आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती याचा खरंच मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार व्हायला हवा असेल, तर मराठी भाषेतील ग्रंथांचे वाचन मोठ्या प्रमाणावर व्हायला हवे.
विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांपैकी कोणत्या लेखकाचे पुस्तक मला का आवडले यावर अध्यापक किंवा प्राध्यापकांनी महिन्यातून एकदा चर्चासत्र घेतले पाहिजे. पुस्तक मला का आवडले यावर जो उत्तम विश्लेषण करेल त्याला प्रोत्साहन म्हणून एखाद दुसरे पुस्तक भेट दिले पाहिजे. यातून विद्यार्थ्यांत वाचनाची आवड, स्पर्धा वाढेल. घराघरातल्या पालकांनीही वाचनसंस्कृतीच्या चळवळीत सामील झाले पाहिजे, असेही म्हात्रे म्हणाले.
या कार्यक्रमाला कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जा. र. ह. कन्या शाळेतील विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांचे विविध अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.