नवी मुंबई, ( दिलीप कालेकर ) : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत बाष्पके संचालनालय आयोजित बॉयलर इंडिया २०२४ या जागतिकस्तरावरील प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते संपन्न झाले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात, चर्चासत्रे आणि कार्यशाळांद्वारे बॉयलर उद्योगातील तंत्रज्ञान, नवीन साधने आणि औद्योगिक सुरक्षा यावर सखोल चर्चा होणार आहे.
बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर (BMMS) चे लोकार्पण देखील या कार्यक्रमात करण्यात आले. या प्रणालीमुळे बाष्पके उद्योगांमध्ये बाष्पकांच्या सुट्या भागांच्या निर्मितीची प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि अधिक कार्यक्षम होईल. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्याचे दस्तऐवजीकरण एका प्लॅटफॉर्मवर सुलभतेने केले जाईल, ज्यामुळे उत्पादक आणि नियामकांमध्ये अधिक सुसंवाद साधला जाईल. BMMS प्रणालीमुळे औद्योगिक कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारेल आणि कागदपत्रे व्यवस्थापनात सुलभता येईल. या तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त कार्यक्षमता वाढवण्यासाठी नाही तर कामगारांच्या सुरक्षेसाठी देखील महत्त्वपूर्ण ठरेल.
उद्घाटन कार्यक्रमानंतर कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "महाराष्ट्र केवळ भारतातच नाही तर दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व आणि युरोपमध्ये देखील बॉयलर उद्योगात आघाडीवर आहे." त्यांनी ही माहिती दिली की केनियन सरकार भारतीय बाष्पके विनियम १९५० च्या धर्तीवर त्यांचे केनियन बॉयलर रेगुलेशन्स विकसित करण्यासाठी महाराष्ट्र बाष्पके संचालनालयाशी सामंजस्य करार (MOU) करण्यास उत्सुक आहे.
बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर यांनी बाष्पके उद्योगातील रोजगाराच्या संधींबद्दल उपस्थितांना अवगत करून दिले. त्यांच्या मते, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात बाष्पक परिचर आणि प्रचालन अभियंत्यांना प्रमाणित केले जाते, आणि यामुळे राज्यातील औद्योगिक सुरक्षा सुधारणांमध्ये मोठे योगदान मिळत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बाष्पके संचालनालयाने राबविलेल्या यशस्वी उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
बॉयलर इंडिया २०२४ मध्ये २६० हून अधिक उद्योजक सहभागी झाले आहेत. इटली, जर्मनी, यूके, चीन, स्वीडन, बेल्जियम आणि नेदरलँड यांसारख्या आंतरराष्ट्रीय उद्योजकांनीही यामध्ये सहभाग घेतला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रांत ऊर्जा आवश्यकतांची पूर्तता आणि हवामान बदलांवरील उपाय या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे. यासह विविध उद्योगांतील तज्ज्ञ इंधन रूपांतरण तंत्रज्ञान आणि औद्योगिक कार्यक्षमता यावर आपले विचार मांडतील.