भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राचे मत
नवी दिल्ली: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) २०२५ मध्ये होणाऱ्या टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. हरियाणा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीने सोनीपत येथे ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’ आयोजित केलेल्या परिषदेत सांगितले, “माझे सत्र संपले असून २०२५ होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिपकडे लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यासाठी आतापासून तयारी सुरू करणार आहोत. ऑलिम्पिक नेहमीच मनात राहत असले तरी त्यासाठी अजून चार वर्षांचा अवधी आहे.
दुखापतीबद्दल विचारले असता २६ वर्षीय खेळाडू म्हणाला, हे वर्ष माझ्यासाठी दुखापतींनी भरलेले आहे. मात्र, आता दुखापत बरी आहे. नवीन हंगामासाठी मी पूर्णपणे तंदुरुस्त असेन. तांत्रिक बाबीही आहेत, आम्ही यावर काम करू. माझे तंत्र सुधारण्यावर माझा भर असेल. भारतात सराव करायला आवडते पण स्पर्धा सुरू झाल्या की परदेशात सराव करण्याचा फायदा अधिक होतो.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकही सुवर्णपदक जिंकले नाही या प्रश्नावर नीरज चोप्रा म्हणाले, अनेक भारतीय खेळाडू चौथ्या क्रमांकावर होते. त्यावर, पॅरालिम्पिकमध्ये भारताची कामगिरी चांगली होती. पुढील ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील, अशी आशा त्याने व्यक्त केली.
नीरज चोप्राने ९ सप्टेंबरला सरावादरम्यान दुखापत झालेली असताना देखील त्याने डायमंड लीगमध्ये सहभाग नोंदविला होता. वैद्यकीय पथकाच्या मदतीने नीरजला डायमंड लीगचा अंतिम सामना खेळता आला. मात्र, त्याचे विजेतेपद हुकले आणि दुसरे स्थान पटकावले.