डोंबिवली ( शंकर जाधव): आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) विद्यमान डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी डोंबिवलीतील लोटस रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि बहीण असा परिवार आहे.
शुक्रवारी २७ तारखेला त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील मोक्षधाम येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, जय जाधव, माणिक उघडे, विठ्ठल खेडेकर, किशोर मगरे, कल्पना किरतकर,माजी नगरसेवक विकास म्हात्रे,मुकुंद ( विशू ) पेढणेकर,समीर चिटणीस,प्रकाश पवार, शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यासह विविध राजकीय पक्षातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने डोंबिवलीच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अंकुश गायकवाड यांनी आंबेडकरी विचारधारेचा प्रचार व प्रसार करत सामाजिक न्यायासाठी अविरत संघर्ष केला. त्यांनी अनेक वर्षे रिपब्लिकन चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि डोंबिवलीतील अनुसूचित जाती आणि वंचित समाज घटकांच्या हक्कांसाठी सतत लढा दिला.
रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीची मोठी हानी
अंकुश गायकवाड हे अत्यंत प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते होते. दिलदार, ईमानदार गोल्डनमन अंकुश गायकवाड हे विनम्र स्वभावाचे सोन्या सारखा माणूस होता. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत अंकुश गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. येत्या दिनांक २९ सप्टेंबर रोजी रामदास आठवले हे दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या डोंबिवलीतील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.