हसन मुश्रीफ फाऊंडेशनमार्फत पुतळ्यासाठी २५ लाखाचा निधी
कोल्हापूर ( शेखर धोंगडे ): किल्ले पन्हाळगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला होय. या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्याची घोषणा पालकमंत्री हसनमुश्री यांनी केली आहे. शासनाच्या धोरणानुसार पुतळ्यासाठी निधीची तरतूद नसल्यामुळे पुतळ्याच्या उभारणीसाठी हसन मुश्रीफ फाऊंडेशनने २५ लाख रुपयांचा निधी देऊन पुढाकार घेतला आहे. हा धनादेश मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते शिल्पकार किशोर पुरेकर यांना प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील छत्रपती श्रीमंत ताराराणी सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीतपावन झालेला किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळगड. हजारो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटक या किल्ल्यावर येत असतात. या किल्ल्याला सिद्धी जोहरने साधारणत: चार महिने वेढा दिला होता. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज सहीसलामत सुटून विशाळगडाकडे रवाना झाले. परंतु; याच किल्ले पन्हाळगडावर आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नाही, याची मनाला सतत टोचणी होती. वर्षभरापूर्वी पालकमंत्री एका कार्यक्रमानिमित्त गेलो असता पंचायत समितीच्या बाजूलाच असलेल्या शिवजीर्थ उद्यानातील अर्धपुतळ्याला अभिवादन केले आणि पूर्णाकृती पुतळा नसल्याची खंत व्यक्त केली. त्याचवेळी निर्धार केला की, लवकरच किल्ले पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करू.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर महापालिकेच्या मुख्याधिकारी के. मंजूलक्ष्मी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, नितीन दिंडे, प्रा. मधुकर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.