'त्या' रहिवाशांच्या न्यायासाठी संघर्ष करत राहू - दीपेश म्हात्रे

 



'त्या' ६५ इमारतीतील रहिवाशांसह शिवसेना ठाकरे गटाची पालिका आयुक्तांबरोबर बैठक 


संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल - आयुक्त 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६५ बेकायदा इमारतींच्या पाडकामाचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पक्षाने रहिवाशांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्याबरोबर कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रहिवाशांच्या प्रतिनिधींंसह चर्चा केली.

  

रहिवाशांचा कोणताही दोष नाही. रहिवाशांनी घरे खरेदी करताना सर्व कागदपत्रांची तपासणी केली होती. या इमारती रेरा नोंदणीकृत आहेत. जर कागदपत्रेच खोटी असतील, तर ती मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेनेच कर आणि सुविधा दिल्या, मग दोषी कोण? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतींना प्रमाणपत्र, टॅक्स पावत्या, लाईट व पाणी कनेक्शन दिले होते. त्यामुळे रहिवाशांना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. याला जबाबदार असलेल्या महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.




आराखडा मंजूर करताना कोणाचा दबाव होता? मंजुरी प्रक्रियेत कर्तव्यद्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे मानवी दृष्टिकोनातून पाडकाम प्रक्रिया स्थगित करावी. फसवणूक करणाऱ्या बँक व महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा. बँक अधिकाऱ्यांनी गृहकर्ज मंजूर करताना योग्य तपासणी केली होती का?जर गैरप्रकार झाले असतील, तर बँकेतील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.


 महानगरपालिका अधिकारी, बँकेतील कर्मचारी आणि आर्किटेक्ट यांना सह-आरोपी करा.आराखडा मंजूर करणाऱ्या आर्किटेक्टवरही चौकशी झाली पाहिजे यावर चर्चा झाली.  ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, रहिवासी आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, रहिवाशांना न्याय मिळावा, यासाठी निवेदन देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष रहिवाशांच्या न्यायासाठी संघर्ष करत राहू, असे यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.





Post a Comment

Previous Post Next Post