बांगलादेश: बांगलादेशमधील शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. शेख हसीनाप्रमाणेच हिंसक जमावाने बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांना शनिवारी राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यांनी कायदा मंत्रालयाकडे राजीनामा सादर केला, जो स्वीकारण्यात आला. सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या अपील विभागाच्या पाच न्यायाधीशांनीही राजीनामा दिला आहे. त्यानंतर रविवारी सय्यद रेफात अहमद यांनी रविवारी बांगलादेशचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली
तत्पूर्वी, अंतरिम सरकारच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून जमावाने सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि मुख्य न्यायमूर्ती आणि इतर न्यायाधीशांना दुपारपर्यंत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला. बांगलादेश सेंट्रल बँकेचे गव्हर्नर अब्दुल रौफ तालुकदार यांनीही आपला राजीनामा अर्थ मंत्रालयाकडे सुपूर्द केला आहे. मात्र, आर्थिक अराजकतेची भीती पाहता त्यांचा राजीनामा सध्या स्वीकारण्यात आलेला नाही. न्यायपालिकेच्या सुधारणेची मागणी करणाऱ्या विरोधकांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर ओबेदुल हसन आणि सर्वोच्च अपील विभागाच्या पाच अन्य न्यायाधीशांनी शनिवारी रस्त्यावरील निदर्शने दरम्यान शेख हसीनाची राजवट पडल्यानंतर पाच दिवसांनी राजीनामा दिला.
राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी सरन्यायाधीशांना शपथ दिली. हसीना यांच्या हकालपट्टीनंतर अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून गुरुवारी शपथ घेणारे मुख्य सल्लागार प्रो. मुहम्मद युनूस यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी शनिवारी न्यायमूर्ती अहमद यांची बांगलादेशचे २५ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली.
बांगलादेशातील ढाका विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मकसूद कमाल आणि बांगला अकादमीचे महासंचालक प्रोफेसर डॉ मोहम्मद हारुन-उर-रशीद अस्करी यांच्यासह अनेक उच्च अधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि इतर निदर्शकांच्या नवीन निषेधाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदांचा राजीनामा दिला.
हसीनाने राजीनामा दिलेला नाहीः सजीब
दरम्यान, पंतप्रधान हसीना यांचा मुलगा साजिब वाजेद यांनी दावा केला आहे की हसीनाने औपचारिकपणे राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे त्या अजूनही बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. ते म्हणाले की, हिंसक जमाव पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जात असल्याने हसीना यांना देश सोडण्यापूर्वी राजीनामा देण्याची संधी मिळाली नाही.