शमिका भिडे आणि धनंजय म्हसकर यांचा स्वरगंध कार्यक्रम
अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे कोजागरी पौर्णिमेंनिमित्त बुधवार दि.१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता आरसीएफच्या कुरूळ वसाहतीत सुप्रसिद्ध युवा गायक शमिका भिडे आणि धनंजय म्हसकर यांचा स्वरगंध हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे..
कोजागरी पौर्णिमेंनिमित्त गेली कित्येक वर्षे मैफिलतर्फे वेगवेगळे दर्जेदार सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या सुश्राव्य सांगीतिक कार्यक्रमांची अलिबाग परिसरातील संगीत रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. यावर्षीच्या कोजागरीला झी मराठी सारेगमप लिटल चॅम्प्स २००८ मधून घरा घरात पोहचलेली शमिका भिडे आणि बंदिश बॅंडीट या वेबसेरीजचा पार्श्वगायक धनंजय म्हसकर सादर करीत असलेला बहुचर्चित स्वरगंध स्वरगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शमिका भिडे हीचं संगीतातील प्राथमिक शिक्षण श्री प्रसाद गुळवणी व सौ मुग्धा भट सामंत, रत्नागिरी येथे झालं आणि गेली १२ वर्ष विदूषी डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे जयपूर अत्रौली घराण्याची तालीम व सांगितिक संस्कार प्राप्त करण्याचं भाग्य तिला लाभलं आहे. दे धक्का, सोयरिक, पल्याड चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणार्या शमिकाने कलर्स मराठी, सोनी मराठी, शीमारू या चॅनल साठी टायटल साँग्स गायली आहेत तसेच संगीत मेघदूत व संगीत चि. सौ. कां. रंगभूमी या संगीत नाटकांमध्ये तिच्या भूमिकांना संगीत रसिकांची पसंतीची पावती मिळाली आहे. आपल्या गुरु व आई वडिलांच्या आशिर्वादाने अनेक पुरस्कारांची मानकरी असलेली शमिका आज अनेक दिग्गज कलाकारांसोबत विविध संगीत कार्यक्रमांमधून रसिकांपर्यंत आपली कला सादर करते आहे. या कार्यक्रमात शमिकाच्या गायन साथीला लोकप्रिय युवा गायक धनंजय म्हसकर असणार आहे. मोनिका पोतदार यांच्याकडे गायनाचे प्राथमिक धडे घेतलेला धनंजय सध्या पं संजीव अभ्यंकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालिम घेत आहे. संगीत रंगभूमीवरील विख्यात गायक नट रामदास कामत यांचे नाट्यसंगीत गायकीचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे. शास्त्रीय गायनासाठी केंद्र सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविलेल्या धनंजयनेही गायनातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केले आहेत. मैफिलच्या कार्यक्रमात हे गुणी युवा कलाकार कोजागरी निमित्त अवीट गोडीच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करणार असून त्यांना या कार्यक्रमात किबोर्डवर विनय चेऊलकर, तबला व हँडसोनिकवर मयूरेश शेर्लेकर तर ढोलकी-ओक्टोपॅडवर जयंत वनाडे यांची साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन विख्यात सुसंवादक संतोष जाधव करणार आहेत.
कार्यक्रम मैफिल अलिबागच्या सदस्यांसाठी असला तरी अलिबाग परिसरातील संगीतप्रेमी रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उदय जोशी (९९२१९२४५००) किंवा भालचंद्र देशपांडे (८८८८५०००२५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.