दिवा मनसे अध्यक्ष तुषार पाटील यांचा इशारा
दिवा, (आरती मुळीक परब) : सध्या दिवा शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. ठिकठिकाणी वाढणाऱ्या कचऱ्याच्या ढीगांकडे बघता सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडलाय की ठाणे महानगर पालिकेच्या दिवा प्रभाग समितीने संपूर्ण दिवा शहराला डम्पिंग ग्राउंड करून ठेवलं आहे का? दिव्यातील प्रत्येक गल्ली बोळात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. हा कचरा उचला नाही तर दिवा प्रभाग समिती समोर टाकू.
दिव्यातील कचरा उचलायला पालिकेचे कर्मचारी उपलब्ध नाहीत. वरिष्ठ अधिकारी कारण देतात कि डायघरला ग्रामस्थ कचरा टाकस्यला देत नाहीत. कारण पालिकेने आज पर्यंत त्यांना दिलेला शब्द कभी पाळलाच नाही. प्रत्येक वेळी ठाण्याचा कचरा इथल्या ग्रामीण भागातील जमिनी मोकळ्या आहेत म्हणून येथे टाकला गेला. आज कचऱ्याची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यासाठी इच्छाशक्ती लागते. ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे ती कधीच नव्हती हे आज उद्भवलेल्या परिस्थितीवरून दिसून येते, असा खरमरीत टोला मनसेचे अध्यक्ष तुषार पाटील यांनी लगावला.
दिवा शहरात लागलेले कचऱ्याचे ढीग हे महापालिकेची कार्यक्षमता दाखवण्यासाठी पुरेसे आहे. या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात दिवा शहरातील कचरा उचलवा आणि यापुढे हा कचरा नियमितपणे उचलला जावा, हा कचरा नियमितपणे न उचलला गेल्यास सगळा कचरा महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती समोर आणून टाकून देऊ. मग त्यानंतर त्याची कुठे आणि कशी विल्हेवाट लावायची हे तुमचे तुम्ही ठरवा. असा इशारा ही पाटील यांनी दिला.