मोहसीन नक्वी यांना आत्मविश्वास
लाहोर : भारताच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत सस्पेंस अजूनही कायम आहे. एकीकडे, बीसीसीआयने स्पष्टपणे नकार दिला आहे, तर २०२५ साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात येईल असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी व्यक्त केला आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानच्या लाहोर, कराची आणि रावळपिंडी या तीन शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. दोन देशांमधील राजकीय मतभेदांमुळे भारतीय क्रिकेट संघाने २००८ पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.
नक्वी यांनी लाहोरमध्ये पत्रकारांना सांगितले की, “भारतीय संघाने यायला हवे. मला वाटत नाही की ते येथे येणे रद्द करतील किंवा पुढे ढकलतील आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्व संघांचे आयोजन करू." यावेळी भारताचा दौराही होईल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी नियोजित वेळ आणि वेळापत्रकानुसार खेळवली जाईल, अशी नक्वी यांना पूर्ण आशा आहे. आयसीसी स्पर्धा पाहता हे स्टेडियम अतिशय आलिशान बनवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पीसीसी प्रमुख म्हणाले, वेळेवर सामने आयोजित करण्यासाठी स्टेडियम्सही सज्ज होतील आणि काही काम शिल्लक राहिल्यास ते स्पर्धेनंतर पूर्ण केले जाईल. दुसऱ्या शब्दांत, तुम्ही म्हणू शकता की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्व स्टेडियम अगदी नवीन असतील. नक्वी यांनाही विचारण्यात आले की ते भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या महिन्याच्या १५ आणि १६ तारखेला पाकिस्तानात असतील. मात्र नक्वी यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. ते सहज म्हणाले, "हो, ते येताय, पण त्याच्या भेटीबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही." एस. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सरकार प्रमुखांच्या परिषदेसाठी जयशंकर पाकिस्तानला भेट देणार आहेत.