व्यवस्थापकाला अटक, मालकाचा शोध सुरू
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले. ऑर्किड स्पा या नावाच्या मसाज पार्लरच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, नितीन भुवड असे अटक केलेल्या मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी या पार्लरमधील पाच महिलांची सुटका केली. डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल जवळील आर्केडिया इमारतीत चालवण्यात येत असलेल्या ऑर्किड स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी सेंटरवर छापा टाकून मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला.
झडती घेतली असता तेथून अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. स्पा सेंटरचा मालक मुकुंद वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत. ऑर्किड स्पा सेंटरचे मालक मुकुंद वाघमारे आणि व्यवस्थापक नितीन भुवड हे महिलांना पैशाचे आमिष दाखवून सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय करवून घेत होते. पार्लरमध्ये मसाजसाठी येणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त सेवेबाबत सांगण्यात आले. त्याबदल्यात त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले जात होते. पोलिसांनी व्यवस्थापकाला अटक करून महिलांची वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून सुटका केली.